किशोर कुबल/ पणजीपणजी : रायबंदर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी खोदकाम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून गाडला गेल्याने मजुराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कंत्राटदार, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लि,चे अधिकारी तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे.
बेजबाबदारपणाबद्दल संबंधित कलमांसह भादंसंच्या कलम १२० (ब) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जावी, अशी मागणी ॲड. पालेकर यांनी केली आहे. सार्वजनिक पैशांची लूट करण्यासाठी संगनमताचा आरोप करीत भ्रष्टाचार प्रकरणीही कारवाई केली जावी, अशी मागणी ॲड. पालेकर यांनी केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रायबंदर येथे रस्त्यालगत खोदकामे सुरु झालेली असून स्थानिकांचा या कामांना विरोध असतानाच सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणखीनच संताप पसरला आहे. राजधानी पणजी शहरात पावसाळ्यात स्मार्ट सिटीची काम अर्धवट सोडल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.