पणजी : बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली. तसेच गेले अनेक दिवस माशांची तपासणी करून पाहिली गेली, पण कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन सापडले नाही, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी ठराव मांडला होता. रसायनांचा वापर करून फळे, भाज्या, मासे, मांस, मसाले दूषित केले जात असल्याने चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची नियुक्ती केली जावी, अशी मागणी फालेरो यांनी ठरावाद्वारे केली होती. सरकारने अशा आयोगाची गरज नाही, असे फालेरो यांना सांगितले. सरकारकडे अन्न सुरक्षा आयुक्त आहेत. माशांच्या आयातीवरील बंदीचा आदेशही आयुक्तांनीच जारी केला, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नमूद केले.सरकारचे अन्न व औषध प्रशासन खाते नियमितपणे फळे, भाज्या, मासे यांचे नमुने घेऊन तपासणी करत आहे. एफडीएची प्रयोगशाळा ही अत्यंत चांगल्या दर्जाची आहे. 162 पेक्षा जास्त मासळीचे नमुने गेल्या अनेक दिवसांत तापसण्यात आले. फॉर्मेलिन आढळले नाही. फळे, भाज्या यांच्यावर रसायनांचा वापर केला जातो, अशा तक्रारी आल्यानंतर लगेच एफडीएचे अधिकारी जाऊन तपासणी करतात. यापुढेही तपासणी सुरूच राहील. एफडीएने एखाद्या ठिकाणी छापा टाकला म्हणून कुणीच आमदारांनी गडबडून जाऊ नये. एफडीएला स्वत:चे काम करू द्या. एफडीएवर विश्वास ठेवा, असे मंत्री राणे म्हणाले. एफडीएकडून आणखी 200 किट्स खरेदी केली जातील. एका किटचा वापर पंचवीस तपासण्यांवेळी करता येतो. गेल्या काही वर्षात अनेक विक्रेत्यांना एकूण चौदा-पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे राणो यांनी स्पष्ट केले.मासे विक्री घटली दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मासळी विक्री घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. अकारण कुणी भीती निर्माण करू नये. मासे, मांस, अंडी वगैरे सगळेच खाणो धोकादायक आहे असे चित्र कुणी निर्माण केले तर पर्यटनाला फार मोठा फटका बसेल. पर्यटन व्यवसायच नष्ट होईल. सध्या कळंगुट व अन्य किनारी भागातील हॉटेलांमध्ये चांगले गरवणीचे मासे आणून दिले तरी, कुणीच ते खात नाहीत. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे लोबो म्हणाले.
भाजी, फळे, माशांची नियमित तपासणी करणार, सरकारची विधानसभेत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 7:44 PM