लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 'वंदे भारत' रेल्वेगाडीचे लोकार्पण शनिवारी (दि. ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींच्या माध्यमातून ते गाडीला हिरवा बावटा दाखवतील. मडगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
दरम्यान, या रेल्वेची नियमित सेवा सोमवारपासून (दि. ५ जून) मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मडगाव येथून रेल्वे दुपारी २:३५ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०:३५ वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५:३५ वाजता रेल्वे सुटेल. तर मडगावात दुपारी १:२५ वाजता ती पोहोचेल. हे अंतर ५८६ किलोमीटरचे आहे. मुंबई- मडगाव वंदे भारत रेल्वेचे तिकीट १७४५ रुपये आणि ईसी अर्थात एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३२९० रुपये आहे. रेल्वेला गोव्यातील थिवीसह एकूण ११ थांबे असतील.