पणजी : अयोध्याप्रश्नीसर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोवा सरकारने जमाव बंदी लागू केली तरी, जमाव बंदीच्या काळातही धार्मिक सोहळे, फेस्त, जत्रा यासारखे उपक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. एसडीएमकडून परवानगी घेऊन मग अशा प्रकारचे सोहळे आयोजित केले जावेत, असे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गोव्यात तिस दिवसांसाठी जमाव बंदी लागू करणारा आदेश उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणोकर यांनी गुरुवारी रात्री जारी केला. तणाव टाळण्याच्या हेतूने 144 कलम लागू केले गेले. कुठेच पाच किंवा त्याहून जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, मिरवणूक काढली जाऊ नये वगैरे आदेशात म्हटले होते. मात्र गोव्यात सध्या दिपावलीचा सण सुरू आहे. शिवाय पर्यटन हंगामही सुरू आहे. लवकरच जुनेगोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सीस ङोवियर चर्चच्या परिसरात ख्रिस्ती धर्मिय बांधवांच्या नोव्हेना म्हणजे प्रार्थना सुरू होणार आहेत. त्यामुळे जमाव बंदीच्या आदेशाचा फटका धार्मिक सोहळ्य़ांना बसेल अशी भीती काही आमदार व लोकांनीही व्यक्त केली होती.
दरम्यान, धार्मिक सोहळ्य़ांच्या आयोजनावर बंदी येणार नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनीही नवा लेखी आदेश शुक्रवारी सकाळी जारी केला व धार्मिक सोहळे आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी एसडीएमची परवानगी घ्यावी अशी सूचना त्या आदेशाद्वारे केली आहे. न्यायदंडाधिकारी गावडेकर यांनी लोकमतला सांगितले की, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन कोणताही सोहळा किंवा उपक्रम आयोजित करत असेल तर त्यांनी अगोदर एसडीएमची परवानगी घ्यावी. केवळ धार्मिकच नव्हे तर सर्व सोहळ्य़ांना ही अट लागू होते. एसडीएमनी पोलिसांशी फोनवर बोलून किंवा इमेलद्वारे संपर्क साधून सोहळ्य़ांसाठी वेळेत अगाऊ परवानगी द्यावी अशीही सूचना सर्व एसडीएमना करण्यात आली आहे.