शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

सत्तेसमोर धर्मसंकट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 1:15 PM

सर्वधर्म समभावाची जोपासना करणाऱ्या आणि मिनी इंडिया संबोधल्या जाणाऱ्या गोव्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए टेस्ट करण्याच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. सासष्टीतील ख्रिस्ती बांधवांनी ही मागणी करणाऱ्या प्रा. वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. राज्यात अगोदरच मेगा हाउसिंग प्रकल्प, सुप्त भाषावाद हे विषय आहेतच. तूर्त वेलिंगकरांमुळे मुख्यमंत्री प्रमोद वंत यांच्या सरकारसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.

सारीपाट, सद्गुरू पाटील संपादक, गोवा

गोव्यातील भाजप सरकार सध्या हिंदुत्वाच्या सापळ्यात अडकले आहे. वास्तविक असे सापळे विविध राज्यांमध्ये भाजप तयार करत असतो, आपल्या विरोधकांनी त्यात अडकावे असा भाजपचा हेतू असतो. मात्र गोव्यात थोडे उलटे झालेय. गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत नाही. भाजप सत्तेची छानपणे उब घेत असतानाच व काही मंत्री प्रचंड कमावत असताना अचानक धर्मवादाचे भूत उभे ठाकले आहे. एकाबाजूने गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मेगा हाउसिंग प्रकल्प, टीसीपी दुरुस्त्या अशा विषयांवरून सरकारची झोप उडवणे सुरू केले आहे. लोकांनी सांकवाळच्या भूतानीचा फास गोवा सरकारच्या गळ्यासमोर आवळला आहे. तशात आता प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी नवे धर्मसंकट उभे केल्याने त्यात सरकारची गोची व कोंडी होऊ लागली आहे. सांगताही येईना व सहनही होईना अशी सरकारची स्थिती झालीय. कारण एकाबाजूने हिंदुत्ववादी किंवा हिंदूप्रेमी वोट बँकेची भाजपला गरज आहे आणि दुसऱ्याबाजूने वेलिंगकर यांनाही रोखायचे आहे. हे सगळे कसे करावे अशा विवंचनेत सरकार आहे. गृहखाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आहे.

पोलिसांवर प्रथमच खूप ताण आलेला आहे. मडगावसह विविध ठिकाणी जे तणावाचे वातावरण तयार झाले आहे, ते हाताळताना पोलिसांची दमछाक होत आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाच्या कसोटीचाच हा काळ आहे, पण त्याचबरोबर गोव्याच्या सहनशीलतेचीदेखील ही परीक्षा आहे. गोव्यातील सर्वधर्म समभावाचे वातावरण कलुषित करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे.

गोव्याच्या मंत्रिमंडळात या विषयावरून दोन गट तयार झाले आहेत. मंत्री माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा वगैरेंची घुसमट होऊ लागली आहे. शुक्रवारी भाजपच्या कोअर टीम बैठकीत मंत्री माविन गुदिन्हो वेलिंगकरांविषयी बोलले. मुद्दा सेंट फ्रान्सिस झेवियरचा असल्याने गोव्यातील खिस्ती समाज दुखावला गेला आहे. त्यांचे दुखवले जाणे भाजपला परवडणार नाही, असा इशाराच मंत्री माविन यांनी बैठकीत दिला आहे. अर्थात त्या बैठकीला मुख्यमंत्री सावंत व अन्य भाजप नेते हजर होतेच. त्या नंतरच खरे म्हणजे डिचोली पोलिसांत वेलिंगकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

वेलिंगकर आमचे नव्हे असे भाजपने कितीही सांगितले तरी, दक्षिण गोव्यातील खिस्ती समुदाय ते मानायला तयार नाही. वेलिंगकर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेच समीकरण ख्रिस्ती बांधवांच्या मनात ठसलेले आहे आणि संघ म्हणजेच भाजप असे त्यांना वाटते. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. वेलिंगकर यांना आपण पूर्णपणे व्हिलन ठरवले तर आपली हिंदू वोट बैंक अडचणीत येईल याची चिंता गोवा सरकारला आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. मात्र यात गोवा भरडला जात आहे. गोव्याचे सामाजिक वातावरण तापू लागलेय. धर्मवाद, भाषावाद, प्रांतवाद असे विषय नाचविण्याची किंवा पेटविण्याची ही वेळ नव्हे, गोवा म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन राज्य आहे. 

हिंदू, ख्रिस्ती व गोव्याचे मुस्लिम बांधव असे सर्वजण मिळून येथे चांगल्या प्रकारे नांदतात. मात्र अलिकडे कधी जुलूस तर कधी गॉयच्या सायबाचा विषय, अशा मुद्द्यांवरून काहीजण वातावरण तापवू लागले आहेत. इतिहासातील संदर्भ उकरून काढून आता वाद निर्माण करण्यात काय अर्थ आहे? यातून कुणाचे भले होणार आहे? अनेकदा वाद पेटला की त्यात निष्पाप लोकांचा बळी जातो, हे विविध राज्यांत अनुभवास आलेले आहे. त्यामुळे गोव्यात नसत्या फालतू वादांचे भूत कुणी नाचवू नये असे सच्च्या गोंयकारांना वाटते. वेलिंगकर यांच्याप्रती आदर असलेले लोक गोव्यात मोठ्या संख्येने आहेत, पण त्यांनादेखील सेंट झेवियरच्या मुद्द्यावरून वेलिंगकर करत असलेली विधाने आवडत नाहीत.

गोवा आता पूर्वीचा गोवा राहिलेला नाही अशी खंत जुन्या पिढीतील अनेक नागरिक व्यक्त करतात. गोव्याबाहेर स्थायिक झालेले गोंयकार येथे परततात तेव्हा इथले बोडके डोंगर त्यांना पाहायला मिळतात. निसर्ग व पर्यावरण झपाट्याने नष्ट होत आहे. सगळीकडे रखरखीतपणा आलाय. कॉक्रिटची जंगले उभी राहिलीत. गोव्याची मुंबई होतेय अशी खंत लोक व्यक्त करतात. याच भावनेतून मेगा हाउसिंग प्रकल्पांविरुद्ध आंदोलन उभे राहू लागले आहे.

भुतानी, लोढा, मिश्रा आदींच्या बड्या कंपन्यांविरुद्ध जनभावना संतप्त बनू लागलीय. दिल्लीवाल्यांच्या हातात गोवा आणि गोव्याच्या जमिनी जातात याबाबत जनतेला राग आहे. अशावेळी सेंट झेवियरच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्याने ख्रिस्ती बांधव रस्त्यावर आले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनादेखील याबाबत चिंता वाटत असावी असे दिसते. कारण परवाच गांधी जयंतीदिनी त्यांनी विधान केले आहे. जमावाने नसते विषय घेऊन पोलिस स्थानकांवर जाऊ नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अर्थात काणकोणमधील जुलूसच्या विषयापासून हे सगळे सुरू झाले. मात्र सेंट झेवियरच्या विषयावरून सासष्टीतील ख्रिस्ती बांधव खवळले आहेत. त्यांनी वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी लावून धरली. रस्ते अडविले. कोंकणी-मराठी वादावेळी जे घडले होते, ते नव्याने घडताना आता अनुभवास येत आहे. सेंट झेवियर यांना गोंयचो सायब मानणारे केवळ ख्रिस्तीच आहेत असे नव्हे, तर हिंदूधर्मिय देखील आहेत. अशा हिंदूधर्मियांना वाद नको आहे. सेंट झेवियरबाबत गोव्यात भक्ती व श्रद्धा आहे हे नाकारता येत नाही. इतिहासात कधी काय घडले ते सगळे शोधायचे झाले तर कायम त्याच वादात गुंतून राहावे लागेल. मग गोव्याची सामाजिक, शैक्षणिक प्रगतीच होणार नाही. सेंट झेवियरच्या शवाबाबत डीएनए चाचणी करण्याची मागणी आताच का आली? आता डीएनए टेस्ट करून काय साध्य करायचे आहे?

२००० साली स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात प्रथम भाजप सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर पर्रीकर यांनी पुढाकार घेऊन जुनेगोव्याच्या सायबाचा शवदर्शन सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जावा म्हणून सरकारचे सर्व सहकार्य दिले होते. पर्रीकर अनेक बैठका घ्यायचे.

जुनेगोवेचा बायपास वगैरे त्याच काळात बांधला गेला. त्यावेळी वेलिंगकर यांच्याकडे संघचालकपद होते. तेव्हा संघात फूट पडली नव्हती. संघ व भाजप यांच्यात तेव्हा व २००७ पर्यंतही चांगला सुसंवाद होता. मग त्या काळात सेंट झेवियरला विरोध किंवा डीएनए चाचणीची मागणी वेलिंगकर यांनी का केली नाही?

भाजप सरकार सुरुवातीच्या काळापासून सेंट झेवियर फेस्त किंवा शवदर्शन सोहळा याला सहकार्य करत आले आहे. त्यात सरकारची चूक नाही, पण गोव्यातील संघ तेव्हा भाजपसोबत होता. त्या काळात वेलिंगकर वगैरेंनी आंदोलन करायला हवे होते. आता हे विषय निर्माण करून गोव्यातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न कुणीच करू नये असे वाटते.

गोव्यासमोर बाकीचे जीवन-मरणाचे विषय खूप आहेत. काहीजण भाष मुद्द्यावरून तर काहीजण धर्माच्य विषयावरून अलीकडे जी विधाने करत आहत, त्या सर्वच शक्तींना रोखण्याची वेळ आलेली आहे.

गोव्यात काही ख्रिस्ती धर्मगुरुंनी पूर्वी काही हिंदूविरोधी विधाने करून तेढ निर्माण केल्याची उदाहरणे आहेत. दोन्ही कडील उतावीळविरांना आता थांबावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण