फोंडा - आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, पाच तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आमचे उर्वरित तेरा नगरसेवकसुद्धा निवडून येतील. असा विश्वास कृषी मंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की 'केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास आम्हाला निधीची कमतरता भासणार नाही. परिणामी विकास कामे राबवताना सकारात्मक वातावरण मिळेल. नागरिकांचा व मतदारांचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम करून दाखवल्याने त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना होणार आहे.
नगरपालिकेतील लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहे त्यांचा आम्ही योग्य तो अभ्यास केलेला आहे. स्वच्छ व सुंदर शहराची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे .या संदर्भात जो विकासात्मक आराखडा तयार झाला आहे तो पुढील नगरपालिका मंडळाकडून पूर्ण करून घेण्यात येईल. फोंडा शहरातील आजूबाजूचा परिसर हा डोंगराळ असल्याने विकास कामे राबवताना कमी जमीन उपलब्ध होते याचे भान ठेवूनच विकास कामे राबवण्यात येतील. जे काही अपुरे प्रकल्प आहेत ते आगामी काळात पूर्णत्वास आणण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.भूमिगत वीज वाहिन्या मलनिस्सारण प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. तिसऱ्या जिल्ह्याचे जे आपण स्वप्न पाहत आहे ते सुद्धा पाठपुरावा करून पूर्णत्वास आणण्यात येईल. चौकट नव्या इमारतींचे समर्थन:- रवी नाईक यांच्या म्हणण्यानुसार नगरपालिका मंडळाला जर अतिरिक्त महसूल प्राप्त करायचा असेल तर शहरात नव्या इमारती उभ्या रहायला हव्यात. इमारती तयार झाल्या तरच महसूल वाढेल. थोडक्यात त्यांनी शहरातील नवीन इमारतींचे समर्थन केले आहे.