मडगाव: सोनसोडो कचरा यार्डात साठून असलेला कचर्याचा डोंगर कमी करण्याच्या कामाला आता गती आली असून सुमारे ४० हजार टन कचरा रेमेडियेशन पद्धतीने साफ केला असून पावसापूर्वी किमान १२० हजार टन कचरा या पद्धतीने साफ केला जाईल अशी आशा पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी स्वता जाऊन या कामाची पाहणी केली. दरम्यान कचरा प्रक्रिया प्रकल्पात जो कचरा साठून होता त्याचेही रेमेडिएशन चालू असून सुमारे ३० ट्रक कचरा काढून टाकला असून येत्या आठ दिवसात हा साठून असलेला हा सारा कचरा साफ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोनसोडोच्या या प्रकल्पात सुमारे १०० टन कचरा साठून होता. सध्या तो उचलण्यासाठी प्रकल्पातील क्रेनसह एका जेसीबी मशीनचा वापर सुरू केला आहे. हा कचरा पुर्णपणे साफ झाल्यानंतर नव्या कचर्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान सुक्या कचर्याच्या बेलिंगच्या कामालाही सुरवात झाली आहे.मागच्या मे महिन्यात सोनसोडयावरील कचर्याला आग लागल्यानंतर ह्या साठलेल्या कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने हा कचरा त्वरित कमी करा असा आदेश दिल्यानंतर रेमेडिएशन प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या यार्डात सुमारे तीन लाख टन कचरा साठून होता.दरम्यान मंगळवारी कचर्याला जिथे आग लागली होती तेथील कचरा पोकलीनच्या सहाय्याने बाजूला काढून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली. सध्या गरमी वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माती टाकण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी संगितले.
सोनसोड्यावरील ४० हजार टन कचर्याचे रेमेडिएशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 6:38 PM