- मयुरेश वाटवे
निवडणुकीशी माझी पहिली ओळख झाली चौथीत असताना. साल 1984. तेव्हा चौकोनी बिल्ल्यावरील हाताचे चिन्ह, घरात, दारात, अगदी आमच्या शाळेतील वर्गातही प्रत्येकाच्या हातात असे. निवडणुकीच्या काळात कोण सिंह, कोण हात, कोण दोन पानं असं काहीबाही जमवत राहायचा. कोणी किती बिल्ले जमवले याच्या स्पर्धाही लागायच्या. त्यानंतर दुसरी निवडणूक आली 89 साली. उघडय़ा जीपमधून फिरणारे व्ही. पी. सिंग तेव्हा टीव्हीवर दर्शन द्यायचे. त्यांच्या धाडसाचं कौतुक घरादारात होत राहायचं. त्यांची त्यापूर्वीच्या राजकारण्यांपेक्षा ती वेगळी टोपी लक्षात राहिली. व्ही. पी. सिंगांबद्दल नाही, पण राजकारणाबद्दलचा इंटरेस्ट व्ही. पी. सिंगांच्या या जीपदर्शनाने निर्माण केला तो कायमचा.
89 चं ते साल मंडल-कमंडल वादाने लपेटलेलं. त्याचा अर्थ कळत नव्हता, पण शब्द मात्र तोंडात बसला. 89 ते 91 सालात सतत निवडणुकाच आहेत की काय असं वातावरण होतं. त्या काळी निवडणुकीत कोण जिंकणार हे जवळपास निश्चित असायचं. इतर पक्षांचे उमेदवार पडेल चेह-यानं निवडणुकीला सामोरे जायचे. किमान लोकसभा निवडणुकांत तरी.
हे चित्र पहिल्यांदा बदललं ते 1991 साली. तेव्हा उत्तर गोव्यातून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार होते मनोहर पर्रीकर! अनेक बिल्ल्यांत आता कमळाची भर पडली होती. पण आमचं वय वाढलं होतं आणि ते बिल्ले जमवायचे दिवसही मागे पडले होते. आमचं ते दहावीचं वर्ष. दहावीच्या परीक्षेचं टेन्शन आणि त्याच वेळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी. मोजक्या दहा कार्यकत्र्याना घेऊन मनोहर पर्रीकर आमच्या घरी प्रचारासाठी आले होते. हा उमेदवार पडेल आहे असा कोणताही भाव त्यांच्या चेह-यावर नव्हता. उत्साहानं मुसमुसणारे. माझे वडील पर्रीकरांना ओळखत नसले, तरी बरोबरच्या कार्यकर्त्यांना ओळखत असल्याने त्यांनी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं. बाहेरच्या कट्टय़ावर बसून सर्व लोकांनी ब-याच गप्पा केल्या होत्या. चहापाणीही झालं. वडील पूर्वी कधीतरी विश्व हिंदू परिषदेशी संबंधित. त्यामुळे जुन्या ओळखी काढणं सुरू झालं. हरवलेलं काही तरी सापडलं असावं अशा आनंदी भावनेनं त्यांनी नंतर आमचा निरोप घेतला. त्यातील कार्यकर्त्यांनी जाता जाता ‘‘आमच्या उमेदवाराला मत द्या’’ असं सांगितलं असता वडिलांनी ‘आमचेच’ असं म्हणून त्यांना निरोप दिल्याचं आठवतं.
वडिलांनी कोणाला मत दिलं माहीत नाही. कारण तेव्हा कमळापेक्षा सिंह हृदयाच्या अधिक जवळ होता. हिंदूंची मतं सिंहाला, हिंदूंतील सारस्वत हाताच्या बाजूनं आणि ख्रिस्ती लोकांची मतं दोन पानाला अशी ढोबळ विभागणी होती.
आमच्याबरोबर व्हरांडय़ातील सोप्यावर बसून चकाटय़ा पिटून गेलेली व्यक्ती दहा वर्षात राज्याची मुख्यमंत्री होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं. मनोहर पर्रीकर ती निवडणूक हरले, पण त्यांची जिद्द? ती नि:संशय जिंकली होती!
तेव्हा ते कार्यकर्ते उत्साहात होते, कारण त्यांना ते निवडणूक हरणार हे अगोदरच माहीत असावं. पण या प्रचाराचा उपयोग त्यांनी लोकांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी, गावागावात पोचण्यासाठी केला होता, हे आज लक्षात येतं. बाबरी मशीद पाडल्यानंतर राममंदिरासाठी विटा जमविण्यासाठी गावागावातून ज्या झुंडी निघायच्या त्यावरून याचा अंदाज येई. पुढे काही वर्षात त्याची फळं त्यांना मिळायची होती.
मनोहर पर्रीकर नावाचं अष्टाक्षरी गारूड काय आहे ते या ट्रेलरमधून लक्षात येतं. 1991 सालचा पडेल उमेदवार ते 2000 सालापर्यंत एक अभ्यासू विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी निर्माण केलेला दबदबा हा केवळ ट्रेलर होता. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी निर्माण केलेल्या साधनसुविधा बघता ‘‘पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त’’ हे शब्दश: खरे ठरले.
ते विरोधी पक्षनेते असताना ‘लोकमत’च्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्तानं केवळ पंधरा मिनिटं त्यांच्याशी भेट झाली होती. त्या अंकाचं प्रकाशन केल्यानंतर त्यांनी सहज तो अंक चाळला आणि त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली- ‘‘जाहिराती सर्व इच्छुक उमेदवारांच्याच दिसतात.’’ विधानसभा निवडणुका तेव्हा तोंडावर होत्या. ‘‘माझ्या मित्रानं (डॉ. प्रमोद पाठक) काय कथा लिहिलीय वाटतं.’’ आणखी एक दोन अशाच प्रसंगाला अनुरूप अशा कमेंट त्यांनी केल्या. कामाच्या गडबडीतही काही क्षणातच त्यांनी तो अंक स्कॅनच करून काढला होता जणू.
दुसरी त्यांची अशीच भेट झाली ती एका वेबसाईटच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही ते मोकळे होण्यासाठी ताटकळत होतो, बाहेर आलेला चहा घेत होतो. आणि ते एकाच वेळी बरीच कामं करत होते. कोणाशी तरी फोनवर बोलत होते, समोर एक संचालक बसले होते त्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित सूचना देत होते. त्याच खात्याशी संबंधित कसलं तरी टेंडर भरलेला एक ठेकेदार आला होता. त्याच्याशी किमतीची घासाघीस सुरू होती. त्यानं टेंडर भरताना दिलेली रक्कम आता परवडणार नाही असं काही तरी तो सांगत होता. फोनवर इंग्लिश, संचालकाशी कोकणीत आणि ठेकेदाराशी मराठीत असा एकाच वेळी संवाद सुरू होता. ‘‘दर वाढवून देणं जमणार नाही. सरकारी काम आहे ते. उगीचच कसा दर वाढवता येईल?’’ संचालकाकडे वळून म्हणाले, ‘‘पळय, सांग ताकां, जावचें ना ते.’’ (बघा. सांगा त्यांना. जमणार नाही) तो विषय त्यांनी तिथेच संपवून टाकला.
थोडा वेळ मोकळा मिळाल्यानंतर वेबसाईटचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही लॅपटॉप पुढे केला. त्यांनी ती वेबसाईट क्लिक करून त्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यात काय काय आहे ते बघायला लागले. यासाठी कोण फायनान्स करतंय? ती कशी परवडणार? त्यासाठी जाहिरात घेणार का? त्यात हे असायल हवं, ते असायला हवं अशा सूचना ते करत होते. ती वेबसाईट समृद्ध होण्यासाठी काय केलं पाहिजे इथपासून ती आर्थिकदृष्टय़ा परवडण्यासाठी काय करता येईल इथपर्यंत त्यांनी अनेक सूचना केल्या. मल्टिटास्किंगचा तो अजब नमुना होता.
अनेक आंदोलक त्यांना आपल्या समस्या सांगण्यासाठी जात तेव्हा त्यांच्या चेह-यावर राग असे. पण ते पर्रीकरांच्या केबिनमधून बाहेर येत तेव्हा हसत असत. भाईनी त्यांना समजावलेलं असे. त्यांनी काय सांगितलं हे महत्त्वाचं नसे. त्याचा एण्ड रिझल्ट महत्त्वाचा असे. तो पर्रीकरांना हवा तसाच मिळालेला असे.
एक पत्रकार म्हणून ते असं कसं करत याचं कुतूहल होतं. त्यांच्याशी झालेल्या दोन ओझरत्या भेटीत त्याचा अनुभव घेतला.