दोन आठवड्यांत होर्डिंग्स हटवा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2024 01:19 PM2024-09-13T13:19:59+5:302024-09-13T13:20:15+5:30
न्यायालयाने सबंधित कंत्राटदारांना ते होर्डिंग्स २ आठवड्यात हटविण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मेरशी सर्कल ते बांबोळीपर्यंत आणि राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) वरील मेरशी सर्कल ते कदंब पठारामार्गे अनमोडपर्यंत रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेले होर्डिंग्स दोन आठवड्यात न हटविल्यास कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे.
खंडपीठाने ४ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात या मार्गासमोरील होर्डिंग तीन आठवड्यांत हटविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर एक आठवडा संपला तरी होर्डिंग्स हटविण्यात सरुवातही करण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी सुनावणीवेळी ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली तेव्हा न्यायालयाने सबंधित कंत्राटदारांना ते होर्डिंग्स २ आठवड्यात हटविण्यास सांगितले आहे.
जर कंत्राटदारांनी होर्डिंग्स हटविले नाही, तर रस्ता व वाहतूक मंत्रालयाकडून ते हटविले जावे. तसेच सबंधित कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करावी. होर्डिंग्स हटविण्याचा खर्चही कंत्राटदारांकडून वसूल केला जावा. त्यांना खर्चाची रक्कम दोन आठवड्यात जमा करावी लागेल, असेही न्यायालयाने सुनावले आहे.