पणजी - गोव्याच्या मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेली कला अकादमी ही भव्य वास्तू आता कात टाकणार आहे. या पूर्ण वास्तूचे नूतनीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे कला अकादमीला आता प्रथमच स्वतंत्र असे सहाशे प्रेक्षक क्षमतेचे प्रेक्षागृह लाभणार आहे. कांपाल येथे निसर्गरम्य परिसरात असलेल्या कला अकादमीच्या मागील बाजूने मांडवी नदी वाहते. पुढे अरबी समुद्र व मांडवीचा संगम होतो. या वास्तूमध्ये देश-विदेशातील कलाकारांचे कार्यक्रम अनेकदा होत असतात. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन व समारोप सोहळा 2003 साली याच वास्तूमध्ये झाला होता. दरवर्षी इफ्फीवेळी या वास्तूमध्ये चित्रपट दाखविले जातात. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाचे नाट्यगृह कला अकादमीत आहेत. महाराष्ट्रातील स्व. पु.ल. देशपांडे यांच्यापासून कवी शंकर वैद्य व अन्य अनेक दिग्गजांचे कार्यक्रम कला अकादमीत यापूर्वीच्या काळात झालेले आहेत. दिलीप कुमारसह, स्व. शशीकपुर व अन्य अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी गेल्या पंधरा वर्षात या प्रकल्पाला भेट दिलेली आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तूरचनाकार चाल्र्स कुरैय्या यांच्या वास्तूरचनेचा कला अकादमी हा आविष्कार आहे. या प्रकल्पाला अलिकडे गळती लागलेली आहे. पावसाळ्य़ात आर्ट गॅलरी व अन्यत्र गळते. यामुळे पूर्ण वास्तूचे नूतनीकरण करण्याची योजना मंजूर झालेली आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी याबाबत लोकमतशी बोलताना वृत्ताला दुजोरा दिला. कला अकादमीची वास्तू आणखी मोठा ताण घेऊ शकत नाही. आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमांचे बुकिंग घेणे आता बंद केले आहे. कला अकादमीमध्ये पूर्ण सुधारणा केल्यानंतरच जास्त कार्यक्रम येथे करू दिले जातील. अकादमीच्या बाजूला जी जागा वाहन पार्किंगसाठी वापरली जाते, तेथील थोडी जागा नवे प्रेक्षागृह उभे करण्यासाठी वापरली जाईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचा आदेश कंत्राटदाराला देण्याचा आमचा प्रयत्न असेल.