किशोर कुबल/ पणजी
पणजी : गोव्यातील ज्येष्ठ सुप्रसिध्द डॅाक्टर, गोमेकॅाचे माजी प्राध्यापक रामचंद्र सरदेसाई (वय ८७) यांचे बुधवारी सकाळी दु:खद निधन झाले.गोमेकॉत अध्यापन करताना अनेक डॉक्टर त्यांनी तयार केले. राजधानी शहरात भाटले येथे त्यांचा दवाखाना होता. हातगुणामुळे ते प्रसिध्द होते. डॉ. सरदेसाई यांना लेखनाचीही आवड होती. त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. अखेरपर्यत ते सक्रीय होते व त्यांची प्रॅक्टिस चालू होती. हाताला गुण असल्याने त्यांच्या दवाखान्यात नेहमीच गर्दी असायची.
डॉ. सरदेसाई १९६४ साली गोमेकॅाच्या ॲनॉटॉमी विभागात सेवेत रुजू झाले. एप्रिल १९६९ साली अॅनॉटॉमीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.आरोग्य खात्याचे माजी संचालक डॉ. अरविंद सालेलकर, मानसोपचार संस्थेचे माजी संचालक डॉ. जॉन फर्नांडिस, डॉ. यु. नास्नोळकर, डॉ. व्ही. जी. धुमे. डॉ. एम. सरदेसाई, डॉ. पी. नाईक, डॉ. वास्को डिसिल्वा, डॉ. ए. व्ही. माईणकर हे त्यांचे विद्यार्थी होत. डॉ. सरदेसाई यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.