लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :कोकण रेल्वेकडून रेंट अ बाइक सेवेसाठी निविदा काढण्यात आली असून, ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी रेंट अ बाइक व्यावसायिकांनी केली आहे. काल शनिवारी बाणावली येथे रेंट अ बाइक व्यावसायिकांकडून यासंदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. यासंदर्भात आज उत्तर गोव्यात एक बैठक घेतली जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कारण, ही निविदा घेणारा राज्याबाहेर असेल आणि गाड्या आणणारीही व्यक्ती बाहेरची असेल, त्याचा स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. याविषयी अजून तरी काही ठरविण्यात आलेले नसून सध्यातरी बोलणी चालू आहे. स्थानिक आमदारही ऑपरेटर्सचे समर्थन करत असून, ही निविदा रद्द करण्यासाठी त्यांचे सहकार्य ऑपरेटर्सना लाभत आहे, असे सेबी डिमेलो यांनी सांगितले. हॉटेल इंडस्ट्री येण्यापूर्वी स्थानिक हे पारंपरिक व्यवसायात गुंतले होते.
हॉटेल आल्यानंतर हॉटेल बंद पाडण्यासाठी स्थानिक पुढे सरसावले आहेत. हॉटेल बंद पाडू नयेत आणि पर्यटक आल्यानंतर पर्यटनाचा लाभ स्थानिकांना देखील होणार आहे. पण, आज पर्यटन सर्व बाहेरच्या लोकांच्या हातात गेलेले आहे. याचा स्थानिकांना काही लाभ होते नाही. असले पर्यटन आम्हा का हवे असा सवाल यावेळी वक्त्यांनी केला.
रेंट अ बाइकसारखे व्यवसाय दुसऱ्यांच्या हातात दिल्यास आहे तेही व्यवसाय निघून जातील. त्यामुळे स्थानिकांनी ते सांभाळून ठेवले पाहिजेत. सध्या जो व्यवसाय आहे तोच नीट चालत नाही, मग आणखी व्यवसाय कसा चालविणार. तसेच टॅक्सीवाल्यांनी देखील याला विरोध केलेला असून, त्यांचेही सहकार्य आहे. कोकण रेल्वेने काढलेली निविदा रद्द व्हायला पाहिजे. आमची मुले व्यवसायासाठी परदेशात जातात. फक्त या व्यवसायावर आमचे संपूर्ण घर चालते. याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही आमचा व्यवसाय नाही, असे स्थानिक महिलांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना पत्र
दोन दिवस पूर्व सर्व रेंट अ बाइक ऑपरेटर्सचे मालक भेटायला आले होते. यासंदर्भात त्यांच्या सह्या घेऊन मुख्य सचिवांना पत्र लिहिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री आणि वाहतूक खात्याला देखील हे पत्र पाठविले आहे. त्यांना विनंती केली आहे की, कोकण रेल्वेला ही निविदा रोखून धरण्यास सूचित करावे. हा व्यवसाय स्थानिकांच्या हातात असायला हवा. कारण रेंट अ बाइक या व्यवसायवर अनेक स्थानिक लोकांचा संसार चालत आहे, असे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.
कळंगुट येथे आज बैठक
रेंट अ बाइक व्यावसायिकांची आज सायं. ५ वा. कळंगूट येथे बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली जाईल. ही निविदा १८ जूनपर्यंत रद्द व्हायला पाहिजे. व्यवसाय वाढवावा किंवा आणखी तयार करावा असे जर सरकारला वाटत असेल तर सगळ्यात अगोदर स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे, अशी मागणी व्हेंझी यांनी केली. सर्व पंचायतींनी स्थानिक घटकांना या व्यवसायात प्राधान्य द्यावे अशी मागणी करणारा ठराव घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी पुढे केले.