वासुदेव पागी, पणजी : दुरुस्तीसाठी तिळारी धरणातून बंद करण्यात आलेला पाणी पुरवठा गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गोव्याच्या विनंती नंतर महाराष्ट्र सरकारने दुरुस्तीकामे क्रीडास्पर्धेनंतर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तिळारी कालवा दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. दरुस्तीचे काम हे १५ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार होते. पंतु गोव्यात राष्ट्रीयस्पर्धा २६ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्यामुळे हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती.
महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारीच्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे या कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पाऊस संपल्यावर लवकरच हे काम हाती घेण्याचा निर्णय झाला होता. दुरुस्ती कामाचा खर्च हा गोवा आणि महाराष्ट्र संयुक्तपणे करणार आहे. या कालव्यातून होणारा पाणी पुरवठा हा गोव्याला अधिक प्रमाणात होत असल्यामुळे ७५टक्के खर्च हा गोवा सरकारने करण्याचे ठरले आहे. यंदा मान्सून्ला उशीर झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तिळारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जाल्यास उत्तर गोव्यात पाणी पुरवठा करण्यासाठी सोयीस्कर ठरते.