पणजी : फादर बिस्मार्क मृत्यू प्रकरण पोलिसांनी फाईलबंद केले असले तरी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला आहे. बिस्मार्क यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवाडा देताना खंडपीठाने हा आदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते फादर बिस्मार्क यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या घातपाताची शक्यता तपासानंतर दिसून न आल्याने हे प्रकरण फाईलबंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. या प्रकरणात पूर्वी जुने गोवा पोलिसांनी आणि नंतर क्राईम ब्रँचकडून तपास करण्यात आला होता. दोन्ही तपासांचा निकष एकच होता तो म्हणजे हा घातपाताचा प्रकार नसून अपघाती मृत्यू असल्याचा. परंतु बिस्मार्क यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणात एफआयआर नोंदवून घेऊन तपास करण्यास पोलिसांना भाग पाडण्याची मागणी केली होती. अनेक सुनावण्या झाल्यानंतर खंडपीठाने त्यांच्या बाजूने निकाल देताना पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. २०१५ साली सांतइस्तेव्ह-नजीकच्या नदीत फादर बिस्मार्क यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदले गेले होते. हे प्रकरण खुनाचे प्रकरण म्हणून नोंदवून तपास करण्याची त्यांच्या कुटुंबीयांची मागणी होती; परंतु प्राथमिक तपास करण्याचा आदेश मुख्यालयाकडून आल्यानंतर क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा सर्व शक्यता लक्षातघेऊन तपास केला होता. त्यासाठी फॉरेन्सिक लेबोरेटरीमधूनही अनेक चाचण्या करून घेतल्या होत्या. प्राथमिक तपासात फॉरेन्सिक तपास करण्याचे प्रकार पहिल्यांदाच घडले होते; परंतु इतके करूनही शेवटी न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा गुन्हा नोंद करावाच लागणार आहे. न्यायालयाचा आदेश येताच क्राईम ब्रँचच्या अधीक्षक प्रियंका कश्यप यांनी पोलीस उपमहानिरीक्षक रुपिंदर कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
‘बिस्मार्क प्रकरणात गुन्हा नोंदवा’
By admin | Published: April 12, 2017 2:35 AM