अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : फोंडा नगरपालिकेत आता काही दिवसात नवीन मंडळ स्थापन होईल. यंदाच्या निवडणुकीत रवी नाईक यांची ताकद मिळाल्यामुळे भाजपने निर्भेळ असे यश प्राप्त केले. रायझिंग फोंडाने भाजपला टक्कर देत आपले चार नगरसेवक निवडून आणले. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने एकूण १५ नगरसेवक पुढील पाच वर्षे शहराचा गाडा हाकतील. मात्र, यंदा ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच अल्पसंख्याक समाजाला नगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही.
निवडणुकीत मुस्लीम समाजाचा एकही उमेदवार नसला तरी ख्रिश्चन समाजाचे उमेदवार रिंगणात होते. परंतु, त्यापैकी एकही निवडून येऊ शकला नाही. माजी नगरसेवक काजी, जोईल्द आणियार, नेली आगियार, नेल्सन सुवारीस यांपासून सुरू राहिलेली परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे.
प्रभाग सहामध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर माजी नगरसेवक विल्यम आगियार यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली. येथे भाजपच्या शौनक बोरकर यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मागील वेळी विल्यम आगियार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. परंतु, यावेळी भाजपची रणनीती त्यांच्यावर भारी पडली.
प्रभाग नऊमधून सातत्याने निवडून येणारे विन्सेंट फर्नांडिस यांची प्रभाग फेररचना करतानाच कोंडी करण्यात आली. त्यांची हक्काची मते काढून लगतच्या प्रभागांमध्ये हलवण्यात आली. खरेतर तिथेच त्यांचा पराभव स्पष्ट दिसत होता. तरीसुद्धा त्यांनी भाजपच्या उमेदवाराला कडवी लढत दिली.
प्रभाग १२ मध्येसुद्धा यापूर्वी ख्रिश्चन समाजाचे उमेदवार निवडून यायचे. जेमिनी डायस या सिल्वानगर प्रभागातून निवडून आलेल्या शेवटच्या नगरसेविका येथे ख्रिश्चन उमेदवार एकमेकांसमोर कायम उभे ठाकत असल्याने शिवानंद सावंत सलग चार वेळा निवडून आले. यावेळी मात्र चित्र उलटे झाले होते. हिंदू धर्मीय तीन उमेदवार एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकून उभे होते. ख्रिश्चन समाजातील सातांना कार्दोजो या एकमेव उमेदवार होत्या. परंतु, जेमतेम २५ मते मिळवतानासुद्धा त्यांची दमछाक झाली.
तीन मतांनी पराभव
शहरात प्रभाग क्रमांक तीनमध्ये ख्रिश्चन समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. येथे ख्रिश्चन समाज नेहमी प्रतिनिधित्व करत होता. यंदा शेरील डिसोजा (रायझिंग फोंडा), वेरॉनिका डायस व रेवा फर्नाडिस असे तीन उमेदवार होते. येथे भाजपच्या ज्योती नाईक निवडून आल्या. ख्रिश्चन समाजाच्या मतविभागणीमुळे नाईक यांचा मार्ग सुकर झाला. परिणामी अवघ्या तीन मतांनी शेरील यांचा पराभव झाला.