ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 07 - येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान येथे होणा-या 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) रसिकांची ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी यंदा लवकर म्हणजे 1 ऑगस्ट रोजी सुरू होईल. ही माहिती चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक सेंथील राजन यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक उपस्थित होते. इंडियन पॅनोरामा विभागासाठी अतापासूनच ऑनलाइन प्रवेश नोंदणी खुली केली आहे. यासाठी 7 ऑगस्ट रोजी ऑनलाईन नोंदणीची शेवटची मुदत आहे. नोंदणीच्या हार्ड कॉपी पाठविण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याची माहिती राजन यांनी दिली.
इफ्फीच्या 12 महिन्यांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2016 ते 31 जुलै 2017 दरम्यान निर्मिती झालेले सीबीएफसीतर्फे प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट इंडियन पॅनोरामा विभागासाठी पात्र ठरणार अहेत. सीबीएफसीचे प्रमाणपत्र नसलेल्या चित्रपटांचे प्रवेश देखील स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रवेश आलेल्या चित्रपटांतून 26 फिचर तर 21 नॉन फिचर चित्रपटांची निवड केली जाईल. प्रत्येक चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स सक्तीची आहेत. तसेच ऑनलाइनच माध्यमाने नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
यातील दोन चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात स्पर्धेसाठी पाठविले जातील. यंदा देखील उत्कृष्ट नवोदित (डेब्यू) चित्रपट निर्माता पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांचा शताब्दी पुरस्कारासाठी विचार केला जाईल. 10 लाख रुपये व चांदीचा मोर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दोन चित्रपट या पुरस्कारासाठी पात्र ठरविले जातील.