म्हापसा : कुठल्याही देशाच्या विकासाचा कणा म्हणजे संशोधन. जागतिक स्तरावर प्रगत असलेल्या जपान, अमेरिका, चीनसारख्या देशांच्या तुलनेत संशोधनाच्या क्षेत्रात आपला देश बराच मागे राहिला. देशाची प्रगती व्हायची असल्यास संशोधन महत्त्वाचे असल्याने देशाने संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवे यांनी केले.मूळ भारतीय पण सध्या अमेरिकेतील अॅरिझोन राज्य विद्यापीठात कार्यरत असलेले खगोल शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवे सध्या गोव्यात आहेत. म्हापसा-आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळात सायन्स एक्स्पो २०१८ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहऴ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.भारतात संशोधनाच्या क्षेत्रात बराच अभाव असल्याचे दिसून आले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात मागील १० वर्षे वगळता आपल्या देशाने इतर देशांनी केलेल्या प्रगतीवर अभ्यास करून नक्कल करण्यावर वेळ घालवला. त्यामुळे त्या देशांच्या तुलनेत आपला देश विकासाच्या तुलनेत बराच मागे राहिलेला आहे. याला कारण म्हणजे संशोधनावर उपलब्ध करून देण्यात आलेले आर्थिक पाठबळ. संशोधनासाठी योग्य प्रमाणावर आर्थिक पाठबळ उपलब्ध केल्यास इतर देशापेक्षा आपलाही देश मागे राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.एवढी वर्षे भारताने फक्त सैद्धांतिक संशोधनावर भर दिला. सैद्धांतिक संशोधनावर भर दिल्याने एकूण प्रगतीवर त्याचा परिणाम होत असतो. विकास कमी प्रमाणावर होत असतो. त्यामुळे सैद्धांतिक संशोधना सोबत व्यावहारिक संशोधनावर भर दिला असता तर त्याचा फायदा देशाला झाला असता असे डॉ. तिळवे म्हणाले. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील शास्त्रज्ञांना जास्त मोकळीक दिली जाते. वातावरणाची निर्मिती केली जाते. त्याचा फायदा तेथील शास्त्रज्ञांना संशोधन करताना होत असतो. मोकळीक मिळाल्याने उत्सुकता वाढते. उस्तुकता वाढल्याने शास्त्रज्ञांच्या अभ्यासूवृत्तीत वाढ होते व ते एकूण संशोधनावर त्याचे परिणाम होऊन त्यातून चांगले शास्त्रज्ञ निर्माण होत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.भारतातील शैक्षणिक पद्धत तशी वाईट नसली तरी भारताने बरीच वर्षे पारतंत्र्यात काढल्याने पालकांची मानसिकता अजुनही पारतंत्र्यात असल्या सारखी आहे. सुरक्षेच्या अभावी पालक आपल्या मुलांना स्वातंत्र देण्यास घाबरत असतात. पालकांनी मुलांना योग्य प्रमाणावर स्वातंत्र उपलब्ध करुन दिल्यास त्याचा बराच फायदा देशाच्या एकूण विकासावर होऊ शकतो अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.अमेरिकेसारख्या विकसित देशात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी तशी वातावरण निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे. असलेल्या या स्पर्धेतून त्यावर मात करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतो व याचा फायदा एकूण प्रगतीवर होत असतो. गोव्यात असलेल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेसारख्या आणखीन संस्थांची देशाला गरज असून सरकारने त्यावर अवश्य विचार करावा अशीही मागणी डॉ. विठ्ठल तिळवे यांनी यावेळी बोलताना केली.दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायन्स एक्स्पो २०१८ चे डॉ. तिळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रा. डॉ. डी. बी. आरोलकर, उपप्राचार्य रिता दुकळे, विज्ञान विभागाच्या संयोजन पूजा बिडीये उपस्थित होत्या. डॉ. डी. बी. आरोलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
देशाच्या विकासासाठी संशोधन महत्त्वाचं- डॉ. विठ्ठल तिळवे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 1:54 PM