पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका १८ मार्च रोजी होणार असून त्यासाठीची आचारसंहिता येत्या २८ रोजी लागू होणार आहे. पन्नासही जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना आणि आरक्षणही जाहीर झाले आहे. याबाबत गुरुवारी अधिसूचना निघणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुका १८ मार्च रोजी घेतल्या जातील, ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सर यांच्याकडून ‘लोकमत’ला मिळाली. उमेदवारी अर्ज २८ फेब्रुवारीपासून स्वीकारले जातील. निवडणुकीचा तपशीलवार कार्यक्रमही जाहीर झाला आहे. हरमल, धारगळ, कोलवाळ, चिंबल, मये, उसगाव, गांजे, बोरी, नावेली, रिवण हे मतदारसंघ ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच मोरजी, सांताक्रुझ, खोर्ली, कारापूर-सर्वण, पाळी, होंडा, बेतकी-खांडोळा, सावर्डे, शेल्डे, पैंगीण हे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्याशिवाय कवळे मतदारसंघ ओबीसी महिला, राय- एसटी महिला, वेळ्ळी-ओबीसी महिला, गिरदोली-एसटी महिला, शिवोली-ओबीसी महिला, शिरसई-ओबीसी महिला, सुकूर-ओबीसी महिला असेही मतदारसंघांचे आरक्षण केले गेले आहे. ‘लोकमत’ने यापूर्वी दिलेल्या वृत्तांनुसार उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी पंचवीस मतदारसंघ निश्चित करताना बहुतेक मतदारसंघांची रचना बदलली गेली आहे. (खास प्रतिनिधी)
जिल्हा पंचायतींचे आरक्षण जाहीर
By admin | Published: February 19, 2015 2:19 AM