म्हापसा : येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ११ नगरपालिकांच्या प्रभागांचे आरक्षण ५० टक्क्यांहून जास्त होणार नाही, याची दक्षता पालिका प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. प्रभाग आरक्षणाची अधिसूचना सोमवारी किंवा मंगळवारी या दोन दिवसांत पालिका प्रशासनातर्फे जारी केली जाईल. जिल्हा पंचायतींप्रमाणे सरकारने पालिका प्रभागांचे आरक्षणही ऐनवेळेलाच जाहीर करण्याची राजकीय खेळी खेळलेली आहे. सरकारने जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी ऐनवेळी आरक्षण जाहीर केले होते. या वेळी पालिका निवडणुकांसाठीही सरकारने हीच पद्धत अमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. ३० सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. २५ सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार असल्याने आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी आरक्षण जाहीर करण्याचा प्रयत्न सरकारने या वेळीही केल्याचे स्पष्ट होते. पालिका प्रभाग आरक्षण करण्यापूर्वी गोवा नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करावी लागते. ती सरकारने केली आहे. त्यासाठी राजपत्रात गेल्या मंगळवारी पालिका कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम जारी केला आहे. वटहुकूम जारी केला असला तरी आरक्षण जाहीर केलेले नाही. एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मात्र, महिलांसाठी ३३, इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के, तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण दिल्यास एकूण आरक्षण ६० टक्क्यांहून जास्त होते. त्यामुळे सरकार कशा पद्धतीने प्रभागांचे आरक्षण करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
पालिका प्रभागांचे आरक्षण ऐनवेळीच
By admin | Published: September 21, 2015 1:50 AM