पणजी : खाजगी उद्योग, आस्थापनांमध्ये गोवेकरांना ८० टक्के नोकऱ्या राखीव करण्याची तरतूद असलेले खाजगी विधेयक गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई विधानसभेत सादर करणार आहेत. तशी नोटीस त्यांनी दिली आहे. ‘गोवा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार विधेयक २०२४’ या नावाने हे विधेयक सादर केले जाणार आहे.
गोव्यातील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना डावलून परप्रांतियांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात असल्याने राखीवतेची तरतूद करण्यासाठी हे विधेयक आहे. सरदेसाई हे या विषयावर विधानसभा अधिवेशनांमध्ये वेळोवेळी आवाज उठवत आहेत. २०१९ पासून त्यांनी अनेकवेळा भूमिपुत्रांना नोकय्रांसंबंधी राखीवतेबाबत खाजगी विधेयके आणली परंतु सभापतींनी ती कामकाजात घेतली नाहीत.
येत्या २ फेब्रुवारीपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनातही ते पुन्हा एकदा हे खाजगी विधेयक आणणार आहेत. भूमिपुत्रांना नोकय्रांबाबत ८० टक्के राखीवतेच्या प्रश्नावर गोवा फॉरवर्डने वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. खास करुन फार्मास्युटिकल्स उद्योग शेजारी सावंतवाडी, कारवारमधून कामगार आणतात, अशा तक्रारी आहेत.