लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मये व डिचोलीसाठी लवकरच २ हजार क्युबिक मीटर क्षमता असलेले नवे जलाशय बांधले जाईल, याबाबतचा प्रस्ताव तयार असून तो प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवेळी दिली.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये व डिचोली भागातील पिण्याच्या पाण्यासाठी लामगाव-डिचोली येथे असलेले जलाशय जुने झाल्याने ते जर कोसळले तर लोकांना त्रास होईल. नव्या जलाशयाचे काम कधीपर्यंत सुरू होईल, अशी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
आमदार शेट म्हणाले, लामगाव येथील सदर ८०० क्युबिक मीटर क्षमतेचे जलाशय है २८ वर्षे जुने आहे. या जलाशयातून मये तसेच डिचोली भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. परंतु सध्या या जलाशयाची स्थिती दयनीय बनली आहे. जर ते कोसळले तर लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतील नव्या जलाशयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रलंबित आहे. सरकारने या जलाशयाचे काम त्वरित हाती घ्यावे, जेणेकरून लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी चाल होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याचे ८०० क्यूबिक मीटर क्षमतेचे जलाशयाद्वारे मये, नार्वे, चोडण व डिचोलीच्या काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या जलाशयाची स्थिती उत्तम असून त्याला कुठलीही भीती नाही. त्याला कोणतीही गळती नाही, केवळ छोटी देखभालीच्या कामाची आवश्यकता आहे. सरकार सुमार ३.२३ कोटी रुपये खर्च करून मये व डिचोलीसाठी लवकरच २ हजार क्यूबिक मीटर क्षमता असलेले नवे जलाशय बांधणार आहे. भविष्यात तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता हे नवे जलाशय बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले.