पणजी : पालिका प्रशासन संचालनालयाच्या मुख्यालयात दारे, खिडक्या अशा प्रकारे बंद करून बुधवारी रात्री उशिरापर्यंत अधिसूचनेत बदल करण्याचे काम सुरू होते. राज्यातील अकरा नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाबाबतची अधिसूचना तयार झाली; पण पालिका प्रशासन खात्याने ती बुधवारी (दि. २३) रात्री उशिराही मुद्दामच जारी केली नाही. पणजीतील पालिका प्रशासन संचालनालयाच्या मुख्यालयात अधिकारी व कर्र्मचारी रात्री बराचवेळ बसून आरक्षण अधिसूचनेच्या मसुद्यात विविध बदल करण्याचे काम करत होते. एरव्ही कधी कोणत्याच सरकारी खात्याचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयाची दारे व खिडक्या बंद करून काम करताना दिसत नाहीत. पालिका प्रशासन खात्याचे संचालक एल्वीस गोम्स यांनी प्रभाग आरक्षणाचा जो कच्चा आराखडा तयार केला होता, तो सरकारच्या पचनी पडला नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणात बदल सूचविले. त्यानुसार पालिका प्रशासन खात्याचे अधिकारी रात्री साडेसात वाजता कार्यालयात आले. त्यांनी कार्यालय उघडले व रात्री उशिरापर्यंत ते काम करत राहिले. आत दिवे सुरू होते. दारे बंद केली होती, अशी छायाचित्रेही ‘लोकमत’ने घेतली. पालिका प्रशासन खात्याचे संचालक गोम्स यांना या प्रतिनिधीने विचारले असता, आम्ही अजूनही अधिसूचना तयार करण्याचे काम करत आहोत, असे त्यांनी रात्री नऊ वाजता सांगितले. या वेळी अनेक पत्रकार त्यांच्या कार्यालयाबाहेर होते. अधिसूचना आता जारी होईलच, असे पालिका प्रशासन खात्याचे काही अधिकारी सांगत होते. मात्र, रात्री नऊनंतर गोम्स यांनी अधिसूचना गुरुवारीच (दि. २४) जारी होईल, असे जाहीर केले. अधिसूचनेच्या मसुद्याला अंतिम रूप देण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने ती आता रात्री उशिरादेखील जारी करता येणार नाही, असे गोम्स यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
आरक्षणात फेरफार
By admin | Published: September 24, 2015 1:29 AM