म्हापसा : मांडवी नदीत असणारे कॅसिनो आग्वाद येथील किल्ल्यानजीक स्थलांतरित करण्यास सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नाला कांदोळी ग्रामसभेत कडाडून विरोध करण्यात आला. याबाबतचा ठराव रविवारी (दि़१६) झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच आग्वाद येथे असलेल्या कारागृहाचे रूपांतर वास्तुसंग्रहालयात करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. सरपंच सेंड्रा फियेलो यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात झालेल्या या सभेला कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयातील अधिकारी केशव नाईक उपस्थित होते. ग्रामस्थांनी संयुक्तरीत्या मांडलेल्या कॅसिनो विरोधातील ठरावावर चर्चा करताना दांडो-कांदोळी येथील कॅसिनोबाबतही चर्चा झाली. या कॅसिनोमुळे गैरप्रकारांत वाढ होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत कॅसिनोंना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या वेळी कादोळी पंचायत क्षेत्राला नेरुल पंचायतीला जोडणाऱ्या पुलावरील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणारा प्रस्ताव तुषार लोटलीकर यांनी मांडला. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काही लोक तेथे गुंडगिरी करीत असल्याचे सांगितले़ पुलावर अनेकजण दारूच्या बाटल्या फोडतात. ये-जा करणाऱ्यांना अडवून लुटमारी करत असल्याचेही ते म्हणाले़ तसेच येथे असलेल्या तलावानजीक अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असून त्यात एका मुलीचा समावेश असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
कॅसिनो स्थलांतरास विरोध
By admin | Published: August 17, 2015 1:46 AM