म्हापसा : शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघापाठोपाठ म्हापसा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय मगोच्या गट समितीकडून घेण्यात आला आहे. तसा ठराव पक्षाच्या म्हापशात संपन्न झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. मगोच्या म्हापसा गट समितीची बैठक गटाध्यक्ष अॅड. वामन पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीला मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात बाळू फडके, भारत तोरस्कर, गितेश डांगी, गिरीश कुंकळ्ळकर, रमेश, मणेरकर तसेच इतर जेष्ठ नेते उपस्थित होते. रामदास फळारी यांनी सदर ठराव बैठकीत मांडला नंतर तो सर्वमताने मंजूर करण्यात आला. घेण्यात आलेला निर्णय पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या केंद्रीय समितीला पाठवण्यात आला आहे. केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. म्हापसा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक राज्यातील इतर दोन मतदार संघा बरोबर होणार आहे. त्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदानाची तारीख जाहीर केली जाणार आहे. होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपली पूर्वतयारी सुद्धा सुरु केली आहे. पक्षाने प्रचार कार्य लवकरच सुरु केले जाणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.या तयारीचा एक भाग म्हणून डिसोझा यांच्या निधनानंतरच्या स्थितीवर व रिक्त झालेल्या जागेवर विस्तारीतपणे चर्चा करण्यासाठी सदरची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत विस्तारीतपणे चर्चा झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी मगोचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. मगोचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या म्हापसा मतदारसंघातून २०१७ साली झालेल्या विधानसभेची निवडणूक पक्षाने लढवली होती. त्यात पक्षाचे उमेदवार म्हणून बाळू फडके यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यात त्यांना ४१२९ मते प्राप्त होवून डिसोझा यांच्यानंतर दुसरे स्थान प्राप्त झाला होता.मगोचे कार्यकारी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना गट समितीने घेतलेल्या निर्णयासंबंधी विचारले असता समितीने घेतलेल्या निर्णयची प्रत अद्याप आपल्याला मिळाली नसल्याची माहिती दिली. गट समितीने निवडणूक लढवण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येणार आहे. बैठकीत त्यावर चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने उमेदवारसुद्धा लवकरच जाहीर केले जाईल.
म्हापशातील पोटनिवडणूक लढवण्याचा मगो गट समितीचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 5:02 PM