नारायण गावस
पणजी: मागील २२ दिवस पणजीतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असलेल्या कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून मुख्यमंत्र्यांनी ६ मार्चला मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. जर ६ मार्चला तोडगा काढला नाहीतर ७ मार्च पासून पुन्हा आझाद मैदानावर भव्य आंदाेलन केले जाणार असल्याचा इशारा या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आयटकचे कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले, २५० नवीन बसेस आणून राज्यांतर्गत सगळ्या गावोगावी बससेवा चालू कराणे भविष्य निर्वाह निधीची पुनर्स्थापना करणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ताबडतोब द्यावी, समान काम समान पगाराच्या आधारावर बदली कामगारांना कायम करणे, इलेक्ट्रिक बसेस कदंब व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल, दुरुस्ती करावी, या प्रमुख मागण्यांचे निवदेन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले त्यांनी ६ मार्चला ताेडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲड. मंगेशकर म्हणाले, कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाने ७ फेब्रवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेले २२ दिवस कर्मचारी रोज सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन करत आहेत. पण कदंब बसेस आम्ही बंद ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.