म्हापसा - बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्त्रोत खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाला अद्याप ठोस तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे हा विषय येत्या 48 तासांत न सोडविल्यास विधानसभेवर मोर्चा काढू. तसेच हे गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला आहे. दरम्यान, सर्व समविचारी लोकांनी एकत्रित येऊन या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
सोमवारी (22 जुलै) म्हापशातील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके, आत्माराम पणजीकर, सुदीन नाईक, शंकर फडते, प्रिया राटवड व इतर सदस्य उपस्थित होते.गोवेकरांना मुलभूत सुविधा देण्यास भारतीय जनता पक्षाला पूर्णत: अपयश आले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नाही. गेल्या गणेश चतुर्थीपासून हा पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अभियंते व लोकप्रतिनिधी केवळ थातुरमातुर उत्तरे देऊन हा विषय सोडून देतात, असा आरोप यावेळी विजय भिके यांनी केला आहे.
म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. तर काहींना पाणी पुरवठाच होत नाही. झालाच तर दिवसाला तासभर पाणी येते व त्यातही वेळेचे निर्बंध असते. त्यामुळे लोकांना कामधंदे सोडून पाणी येण्याची वाट पाहावी लागते, असेही भिके म्हणाले आहेत. पाणी, रस्ता व वीज या सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा असतात. मात्र, सरकारला ते उपलब्ध करून देता आलेले नाही. सरकारी यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपा गोरगरीबांचे सरकार असल्याचे मोठ्या वलगणा करतात. मात्र, प्रत्यक्षात यातून सरकारची अकार्यक्षमता दिसते, अशी टीका त्यांनी केली आहे.