- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात अलिकडे आक्रमक बनलेल्या विरोधी काँग्रेस पक्षात फूट पडतेय व त्या पक्षाचे दोघे आमदार फुटतात याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सत्ताधारी आघाडीत समाधान आहे. मात्र, आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समाधानाबरोबरच चिंताही व्यक्त होत आहे. काँग्रेसमधून येणा-या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी घटक पक्षांमधील एक किंवा दोन मंत्र्यांना डच्चू तर दिला जाणार नाही अशी चिंता घटक पक्षांना सतावत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने काँग्रेसचे सतरा उमेदवार निवडून देऊन विधानसभेत पाठविले होते. त्यापैकी विश्वजित राणे हे लगेच काँग्रेसमधून फुटले व ते भाजपामध्ये प्रवेश करत मंत्री झाले. गोव्यात काँग्रेसचे सोळा आमदार अलिकडे पर्रीकर सरकारविरुद्ध खूप आक्रमक झाले. सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत व भाजपाचे मुख्यमंत्री गंभीर आजारी असल्याचा विषय गाजवत काँग्रेसने आपण सरकार स्थापन करणार असल्याचा दावा चालविला होता. त्यासाठी काँग्रेसने राष्ट्रपतींना व राज्यपालांनाही पत्र लिहिले होते. काँग्रेसच्या शिडातील हवा काढून घेऊन त्या पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ कमी करण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या दोघा आमदारांना आता पळविले आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे काँग्रेसचे दोन आमदार फुटत असल्याविषयी गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई हे समाधानीच आहेत. मगो पक्षानेही मोठा आक्षेप अजून घेतलेला नाही. कारण काँग्रेसचे संख्याबळ कमी झालेले व सरकार पाच वर्षे टिकलेले घटक पक्षांनाही हवे आहे. मात्र काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये येणारे सोपटे यांना मंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा आहे. सोपटे यांना मंत्रीपद देण्यासाठी मगोप किंवा फॉरवर्डच्या कुठल्याच मंत्र्याला डच्चू दिला जाऊ नये अशी भूमिका घटक पक्षांनी घेतलेली आहे. मंत्रिमंडळात बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी चर्चा घटक पक्षांमध्ये आहे.
मंत्री विजय सरदेसाई यांनी मगोपचे मंत्री बाबू आजगावकर यांना डच्चू दिला जाऊ नये अशी भूमिका घेतलेली आहे. भाजपाने त्याविषयी अजून कोणतेच भाष्य केलेले नाही.