लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : तांत्रिक शिक्षण संचालनालयातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी दि. ९ व १० मे रोजी घेतलेल्या समान प्रवेश परीक्षेचा (जीसीईटी) निकाल पुढच्या आठवड्यात दि. १५ ते १७ मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो, असे तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी सांगितले. तर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या नीट (नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षांचा निकाल ८ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका इलेक्ट्रॉनिक स्कॅनरद्वारे तपासण्यात येत आहेत, असे कुस्नूर यांनी सांगितले. अभियांत्रिकी, फार्मासी व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी जीसीईटी परीक्षा सक्तीची आहे. जीसीईटीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र अशा वेगवेगळ्या ४ विषयांतून बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी ७५ गुणांचे पेपर्स होते. या निकालानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ ते २६ मे पर्यंत वर दिलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश अर्ज स्वीकारला जाणार आहे. बारावीची गुणपत्रिका, निवासी दाखला आदी दाखले जोडून हा अर्ज भरावा लागणार. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱ्या होणार आहेत. याद्वारे छाननी करून गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
जीसीईटीचा निकाल १५ ते १७ मे पर्यंत शक्य
By admin | Published: May 13, 2017 2:17 AM