म्हापसा - नाताळ तसेच नवीन वर्षात ऐन पर्यटन हंगामाच्या काळात पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने त्याचे परिणाम इथल्या व्यावसायिकांबरोबर किनारी भागातील पंचायतीवर होण्यास सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कळंगुट भागाकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने इथल्या व्यावसायिकांवर झालेल्या विपरीत परिणामाच्या पार्श्वभूमीवर पंचायतीने करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायतीच्या ग्रामसभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
२०१९-२० च्या पंचायतीच्या अंदाजपत्रकाला मंजूरी देताना हा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिकांवरील करात वाढ न करण्याचा निर्णय पंचायतीकडून पहिल्यांदाचा घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली. करात वाढ न करण्याच्या निर्णयासोबत व्यावसायिकांवर लावण्यात आलेला वीज कर सुद्धा माफ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या वर्षीच्या पर्यंटन हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवल्याने त्याचे परिणाम इथल्या व्यावसायिकांवर झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कर लादणे म्हणजे चुकीचे ठरणार असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले. दर वर्षी सर्वसाधारपणे पंचायतीकडून व्यावसायिक व कचरा करात १० टक्क्यांनी वाढ केली जायची; पण यंदा वाढ केली गेली नसल्याने गेस्ट हाऊसवरील लागू असलेला कर प्रती खोली १०० रुपये तसेच व्यावसायिक आस्थापनांवर २०० रुपयांचा कर मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. करात वाढ केली गेली नसल्याने करांची असलेली थकबाकी वसूल करण्यावर पंचायतीकडून भर दिला जाणार असून त्यासाठी विशेष मोहिम सुद्धा हाती घेतली जाणार असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली.
या निर्णया सोबत शेतक-यांना शेतीसाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेताना त्यांना मोफत ट्रॅक्टर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ठरवण्यात आले आहे. या निर्णयातून शेतीच्या लागवडीत वाढ होईल असा विश्वास पंचायतीला वाटत आहे. वाहतुकीत सुसूत्रता आणण्याच्या हेतून ट्रॅफिक वॉर्डनची सेवा भाडेपट्टीवर घेण्याचे ठरवण्यात आले आहे. पंचायत क्षेत्रातील महत्त्वाच्या जंक्शनवर त्यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच वाढत्या वेश्या व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी सुरक्षा रक्षकाची सेवा सुद्धा भाडेपट्टीवर घेतली जाणार आहे. ग्रामसभेत आराडी-कळंगुट भागातील बोआ व्हिएज येथील डोंगर कापणी प्रकरणावर सुद्धा चर्चा करण्यात आली. सदर डोंगराची कापणी करणा-यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करून पंचायत मंडळाला धारोवर धरले.