मडगाव: सनबर्न फेस्टिवल म्हणजे केवळ अंमली पदार्थाचा बाजार असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी करताना हा महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात काही राजकारण्यांचाच हात आहे. मुख्यमंत्र्यांनी या राजकारण्यांची नावे जाहीर करावीत आणि अशा महोत्सवावर कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली.वागातोर येथे झालेल्या या महोत्सवादरम्यान तीन पर्यटकांना मृत्यू आल्याच्या पार्श्वभूमीवर असे महोत्सव बंद करा अशी मागणी वाढू लागली असून, त्यात आता आमदार चर्चिल आलेमाव यांनीही भर घातली आहे. ते म्हणाले, सनबर्न महोत्सवात एका टेबलच्या बुकिंगसाठी 12 लाख रुपये आकारले गेले होते. हा महोत्सव जर साधा संगीत रजनी असेल तर एवढे पैसे देऊन त्यात कोण येणार, असा सवाल त्यांनी केला. गोव्यातील इतर संगीत रजन्या ओसाड पडलेल्या असताना सनबर्नलाच एवढी गर्दी का असा सवाल त्यांनी केला. केवळ ड्रग्सचे सेवन करण्यासाठीच या महोत्सवात येतात याची पुरेपूर जाणीव राजकारण्यांनाही आहे. मात्र या राजकारण्यांना त्यांचा हप्ता पोहोचत असल्यामुळेच ते अशा महोत्सवांना प्रोत्साहन देतात, असा आरोप करतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली.गोव्यात सगळीकडेच अंमली पदार्थ व्यवहार फोफावला आहे काही राजकारणी व पोलीस यांची मिलिभगत या व्यावसायिकांकडे असल्यामुळेच खुलेआम हे व्यवहार चालतात. गोव्यात ािस्ती लग्नासाठीही संगीत वाजविण्याची वेळ दहा र्पयतच ठेवली जाते. मात्र किनारपट्टीवरील कित्येक हॉटेलात पहाटेपर्यंत कर्णकर्कश संगीत चालू असते. या पहाटेर्पयत चालणा-या पाटर्य़ामध्ये अंमलीपदार्थ खुलेआम विकले जातात. मात्र पोलीस व राजकारण्यांचा या व्यावसायिकांना वरदहस्त असल्यामुळेच त्याच्या वाटेला कुणी जात नाहीत असा आरोप त्यांनी केला. गोव्याकडे चांगल्या पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. याचे कारणही हा ड्रग व्यवसायच आहे. आपली मुले या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडू नयेत किंवा त्यांना विनाकारण या सापळ्यात अडकवले जाऊ नये यासाठीच विदेशी पर्यटक आपल्या मुलांना गोव्यात पाठवत नाहीत असेही ते म्हणाले.
Sunburn Festival 2020 : सनबर्नमागे असलेल्या राजकारण्यांचे नाव उघड करा- चर्चिल आलेमाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 5:30 PM