पणजी : गोव्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रात्रीच एन्जिओप्लास्टी झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
बाबूश यांची पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी बाबूश यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले. बाबूश तसे सक्रियच होते. दोन दिवसांपूर्वी मिरामार येथे हनुमान मंदिरात साफसफाईच्या कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला होता.
रविवारी रात्री अचानक त्यांनी छातीत कळा येत असल्याचे घरच्या मंडळींना सांगितल्यावर त्यांना उपचारासाठी गोमेकॉत हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने एन्जिओप्लास्टी केली. गोमेकॉत सध्या ते तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.