काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध प्रभारींसमोर तक्रारींचा पाढा; निलंबित नेत्यांनी घेतली माणिकम टागोर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:25 AM2023-07-07T09:25:46+5:302023-07-07T09:26:32+5:30

प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

review of complaints against congress state president before in charges | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध प्रभारींसमोर तक्रारींचा पाढा; निलंबित नेत्यांनी घेतली माणिकम टागोर यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध प्रभारींसमोर तक्रारींचा पाढा; निलंबित नेत्यांनी घेतली माणिकम टागोर यांची भेट

googlenewsNext

पणजी : काँग्रेसचे युवा ब्रिगेडमधील नेते, माजी सरचिटणीस जनार्दन भंडारी तसेच अन्य चौघांसह पाचजणांना शिस्तभंग कारवाई समितीने निलंबित केले होते. काल या सर्वांनी गोवा भेटीवर आलेले पक्षाचे प्रभारी माणिकम टागोर यांची भेट घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. तसेच प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील पर्वरीतील उमेदवार विकास प्रभुदेसाई यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांची सौजन्य भेट घेतली होती. गोवा व कर्नाटकात म्हादईचा वाद पेटलेला असताना काँग्रेसचे स्थानिक नेते कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देतात यावरून सोशल मीडियावर टीका झाली होती. त्यानंतर स्थानिक नेतृत्वाने प्रभुदेसाई यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
ही नोटीस का बजावली अशी विचारणा करणाऱ्या जनार्दन भंडारी, प्रदीप नाईक, ग्लेन काब्राल, खेमलो सावंत व महेश म्हांबरे या पाचजणांना शिस्तभंग कारवाई समितीने निलंबित केले होते. भंडारी यांनी सहकाऱ्यांसह काल प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रभारींची भेट घेतली व त्यांना आपल्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

प्राप्त माहितीनुसार, तत्पूर्वी कार्यकारिणी बैठकीतही तीन-चार पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी केली. पाटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक दिवसांपासून पक्षातील काहीजणांमध्ये नाराजी आहे. टागोर यांनी त्यांना पाटकर यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे हे तक्रारदारांना सांगितले. त्यावेळी दिगंबर कामत, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना विश्वासात घेतलेले आहे. पाटकर यांना या पदावरून सध्या तरी हटवण्याचा प्रश्नच नसल्याचे टागोर यांनी तक्रारदारांना सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी नवा प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता नाही.

पक्षांतर्गत मामला आम्ही आपापसातच सोडवू

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, बैठकीत तरी माझ्या कार्यपध्दतीवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही किंवा नाराजीही व्यक्त केलेली नाही. आम्ही संघटनात्मक कामाबाबत तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे कसे जावे याबाबत चर्चा केली. प्रभारींना कोणी" स्वतंत्रपणे भेटून काही सांगितले असेल तर मला त्याची कल्पना नाही. पाचजणांच्या निलंबनाबाबत विचारले असता पाटकर म्हणाले की, काही विषय आहेत तो आमचा पक्षांतर्गत मामला आहे. जो काही विषय आहे तो आम्ही पक्षांतर्गतच सोडवू, प्रकरणाची चौकशी चालू आहे व त्याबद्दल मी अधिक भाष्य करु इच्छित नाही.

विकास प्रभुदेसाई बैठकीत आक्रमक

राज्य कार्यकरिणीवर असलेले विकास प्रभुदेसाई बैठकीत आक्रमक बनले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे भाजपची बी टीम असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करून त्वरित त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर विजय भिके, एनएसयुआयचे नौशाद चौधरी व इतर मिळून ८ ते १० जणांनी पाटकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

Web Title: review of complaints against congress state president before in charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.