- सद्गुरू पाटील
आरजीने आपली गोंयकारवादी भूमिका सोडलेली नाही. ते सेटिंगचे राजकारण करत नाहीत. भाजपशीही आरजी संघर्ष करतोय आणि काँग्रेसशीही संघर्ष करतोय, हे मान्य करावे लागेल. आरजी पक्ष रणांगणात सर्वांशी लढत आहे. मात्र यावेळी वाट खडतर आहे. मतदार यावेळी आरजीला साथ देतील की नाही, हे पाहावे लागेल. येत्या ७ मे रोजी गोव्यात मतदान होईल. आता फक्त पंधरा-सोळा दिवस शिल्लक आहेत, लोकसभा निवडणुकीचा ज्वर खूप वाढलाय, कोण पडेल व कोण जिंकेल हे सांगता येत नाही, अशा टप्प्यावर गोव्याचे वातावरण पोहोचले आहे. आम्ही शंभर टक्के जिंकू असे कोणताच पक्ष सांगू शकत नाही, अशी स्थिती आहे.
गेल्या महिन्यात वातावरण तसे नव्हते, किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थिती तशी नव्हती. आता मतदारांची मानसिकता, समाजातील अंडरकरंट्स, रुसवेफुगवे हे सगळे नीट कळू लागलेय. होय, आम्ही तुमच्यासोबतच आहोत असे सांगणारे कार्यकर्ते किंवा सामान्य लोक कुठच्या तरी उमेदवाराला धक्का देण्यासाठी थांबले आहेत. तोंडावर हास्य पण मनात राग अशी लोकांची स्थिती अनेक पंचायत क्षेत्रांमध्ये दिसून येते. भाई लोकसभेत जाऊन काय करतील? भाऊंनी आमच्यासाठी काय केलेय? धेपेंच्या कुटुंबातील महिलेला तिकीट देण्यामागे प्रयोजन काय? विरियातो पूर्ण दक्षिणेत फिरू तरी शकणार काय? ते आरजीवाले मते फोडण्यासाठीच उभे राहिलेत की काय असे विविध प्रश्न लोक विचारतात, अर्थात लोकांचे सगळेच प्रश्न नेते गंभीरपणे घेतात किंवा घ्यावेत असे नाही, पण सामान्य माणसांत खदखद आहे हे कळून येतेच.
मतदारांना कुणाबाबतच प्रेम नाही, सगळेच मेले तसलेच ही कष्टकरी महिलांमधील भावना आहे, बेरोजगारी, महागाई, वीज-पाणी समस्या, गरीबांची होणारी फसवणूक हे सगळे विषय लोकांना छळतात. त्यामुळे राजकारण्यांबाबत लोकांच्या मनात कटुता आहे. आम्ही मत दिले नाही तरी, ते जिंकतील मग आम्ही का मतदान करायला हवे असे विचारणारे लोक कमी नाहीत. देशाच्या काही भागांत परवा पहिल्या टप्यात तुलनेने कमी मतदान झाले, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
भाजपमध्येच भाजपच्या उमेदवारांसाठी काही छुपे शत्रू आहेत. मात्र याचा अर्थ उमेदवार कमकुवत झालेत असा मुळीच होत नाही. तरीही वाट सोपी आहे असे कुणी समजू नये. आताचे आमदार आणि पराभूत माजी आमदार हे एकमेकांविरुद्ध आहेत, आयात भाजप कार्यकर्ते व निष्ठावान किंवा मूळ कार्यकर्ते यांच्यात संघर्ष व गटबाजी आहे. दक्षिणणेत व उत्तर गोव्यात हा अनुभव येत आहे. शिवोलीपालून मांद्रेपर्यंत कुणीही फिरून पहावे, श्रीपाद नाईक यांची सर्वांत जमेची बाजू म्हणजे ते स्वतः कुणाला दुखवत नाहीत. शिवाय ते कधीच उत्तर गोव्यात पराभूत झालेले नाहीत. उत्तरेत मराठा समाज, भंडारी समाज आणि दक्षिणेत एसटी समाज, ओबीसी, खिस्ती मतदार यांच्या मनात जे काय चाललेय ते कळण्यासाठी जास्त अभ्यासाची कुणाला गरज नाही.
उत्तर गोव्यात पंचवीस वर्षे काँग्रेसने यशच पाहिलेले नाही. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची मते फोडण्यासाठी आरजी पक्ष नव्हता. आरजी आपली मते फोडतोय हा काँग्रेसचा दावा त्यामुळे फसवा व चुकीचा ठरत आहे. १९९८ सालची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी खूप वेगळी ठरली होती, त्यावेळी उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधी झाली नाही. काँग्रेसने यापूर्वी उत्तरेत टाइमपास करण्यासारखीच निवडणूक लढवली. यामुळे रमाकांत खलप मात्र गंभीरपणे लढत आहेत असे लोकांचे मत बनलेय, रिव्होल्यूशनरी गोवन्स या पक्षासाठी यावेळची निवडणूक ही जिंकू किंवा मरू अशी झाली आहे. कारण आरजीला आपली ९० हजार मते आणखी वाढली आहेत हे दाखवून द्यावे लागेल.
२०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीला जी ९० हजार मते मिळाली होती, त्या मतांमध्ये जर आता भर पडली नाही तर लोक म्हणतील की आरजीत दम नाही. समजा आरजीची मने घटली व पन्नास हजारापर्यंत खाली आली तर ख्रिस्ती मतदारही बोलू लागतील की- आरजी पक्ष शक्तीहीन झाला आहे. अर्थात आरजीचे उमेदवार जिंकतील की पराभूत होतील हे सांगण्यासाठी मोठ्या राजकीय विश्लेषकांची गरज नाही, समजा आरजी आपली मते फार मोठ्या प्रमाणात वाढवू शकला तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आरजी हाच एकमेव प्रबळ प्रादेशिक पक्ष गोव्याच्या राजकारणात असेल, इतर प्रादेशिक पक्ष तेवढे प्रबळ राहणार नाहीत.
मात्र आरजीची यावेळी लोकसभा निवडणुकीत घसरगुंडी झाली तर आरजी अधिक डिमॉरलाइज होणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. विरियातो परवा बोलले की- यावेळी लोक आपने मत वाया घालवू पाहत नाहीत. आरजीला मत देणे म्हणजे ते वाया जाणे असा विचार लोकसभा निवडणुकीत लोक करतात असे विरियाती म्हणतात. मात्र हा दावा पूर्ण सत्य मानता येत नाही. लोकांच्या मनात काय आहे हे शेवटी ७ मे रोजीच कळून येईल.
काँग्रेसच्या प्रचाराची बस उशिरा सुटलेली आहे हे मान्य करावे लागेल, भाजपचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात दोन-तीनवेळा पोहोचले आहेत. काही ठिकाणी चारवेळाही पोहोचले. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचाराची गती वाढवावी लागेल, आरजीचे मनोज परब आणि दक्षिणेतील रुबर्ट परैरा हे देखील मतदारसंघांमध्ये खूप फिरताना दिसून येतात. आरजीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर हेही खूप घाम गाळत आहेत.
लोकसभा निवडणूक ही भाजपविरुद्ध काँग्रेस किंवा इंडियाआघाडी अशीच आहे, असे काही धर्मगुरु मानतात. काही बिशप काँग्रेसच्याबाजूने तर काही भाजपच्याबाजूने आहेत. अर्थात काहीजण आरजीच्याबाजूनेही असू शकतात, पण ते उघडपणे कुठेच नाहीत. सेक्युलर उमेदवारांना मत था असे आवाहन परवा आर्चबिशपांनी केले. हे आवाहन खरे कुणासाठी आहे ने लोकांना कळतेय.
दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात यावेळी आरजीचा प्रभाव जास्त दिसतोय. पूर्ण दक्षिण गोव्यात आपला प्रभाव दाखवू शकेल अशी रुबर्ट परेरा यांची प्रतिमा नाही. तरी देखील त्यांच्याकडून प्रचारासाठी जे कष्ट घेतले आत आहेत, ते महत्त्वाचे आहेत, मनोज परब उत्तर गौवा पिंजून काढत आहेत. आरजीची जमेची बाजू अशी की-ते स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत. त्याची भूमिका योग्य असो किंवा अयोग्य, पण त्यांनी आपली गोंयकारवादी भूमिका सोडलेली नाही, ते सेटिंगचे राजकारण करत नाहीत. भाजपशीही आरजी संघर्ष करतोय आणि काँग्रेसशीही संघर्ष करतोय हे मान्य करावे लागेल. आरजी ही भाजपची वी टीम आहे असे म्हणता येत नाही. आरजी पक्ष रणांगणात सर्वांशी लढत आहे. आरजीकडे निधी नसला तरी कार्यकर्ते घाम गाळतात फक्त मतदार कोणत्याबाजूने राहतात हे कळण्यासाठी ७ मेपर्यंत थांबावे लागेल.