लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: देशभरातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्याचा एक भाग म्हणून रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली भेटीनंतर परब म्हणाले, 'या भेटीत तेलंगणा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दीर्घ चर्चेवेळी दिली. या उपक्रमांमुळेच तेलंगणाने सर्वांगीण विकास साधला आहे.'
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भारत राष्ट्र समिती पक्ष या तेलंगणातील प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. परब यांनी याआधी शिवसेना (शिंदे) गटाचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गेल्या ऑक्टोबरमध्ये मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट घेऊन चर्चा केली होती. त्याआधी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनाही भेटले होते. मनसे व आरजी या पक्षांच्या प्रादेशिक विचारधारेत साम्य आहे. गोव्यात आरजी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत आहे.
परब यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष स्थानिकांच्या हक्कांसाठी कसे कार्य करीत आहे, हे जाणून घेतले. ही सदिच्छा भेट होती आणि यापुढेही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी चालूच राहतील, असे परब म्हणाले.
- आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागा लढवण्याची तयारी आरजी करीत आहे. त्या अनुषंगाने पक्षाची मोर्चेबांधणी चालू आहे.