ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 5 - गोव्यात ४ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने सुधारित मतदारयाद्या जाहीर केल्या असून ११ लाख ९ हजार २८0 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. २0१६ च्या मतदारयादीच्या तुलनेत २३,१९0 मतदार वाढले आहेत. नव्या मतदारांना नोंदणीसाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून ८ जानेवारीपर्यंत आॅनलाइन किंवा तालुका कार्यालयांमध्ये अर्ज करता येतील त्यानंतर आलेले अर्ज या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीकरिता विचारात घेतले जाणार नाहीत.
मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ही माहिती दिली. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या हस्ते सुधारित मतदार यादी प्रकाशित करण्यात आली.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती, विशेष मुख्य अधिकारी नवीन एस. एल, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.
- महिला मतदारांची संख्या जास्त आहे. ५ लाख ४५ हजार ५३१ पुरुष मतदार आणि ५ लाख ६२ हजार ९३0 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय आठशेहून अधिक सेवा मतदार आहेत.
- १0,१९९ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली.
- १५,00४ मतदारांनी स्थलांतर केले.
-४९,९२१ नवमतदारांची नोंदणी झाली
दोन लाख ओळखपत्रे वितरित करणार
मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या हस्ते बोधचिन्हाचे तसेच सीडीचे अनावरण झाले. मतदानास प्रोत्साहन देणारे जिंगल तयार करण्यात आले आहे. कुणाल यांनी यावेळी सांगितले की, मतदार ओळखपत्रे तयार करण्याचे काम युध्दपातळीवर चालू असून येत्या १५ ते २0 तारीखपर्यंत दोन लाख ओळखपत्रे वितरित केली जातील. येत्या १८ पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. मतदार नोंदणीसाठी नवे अर्ज येतील ती नावे यादीत समाविष्ट करुन १८ पर्यंत सर्व काम पूर्ण केले जाईल. व्हीव्हीपीएटी मशिन्स हे यावेळी मतदानासाठीचे वैशिष्ट्य आहे. इव्हीएमवर कळ दाबून मतदान केल्यानंतर पावती प्रिंट होईल. परंतु ती मतदारांच्या हातात मिळणार नाही किंवा घरीही घेऊन जाता येणार नाही ती तेथेच असलेल्या पॅकबंद डब्यात पडेल.