- संदीप आडनाईक
पणजी : मोरोक्क्को येथे जन्मलेल्या फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या १२0 बीटस पर मिनिट या चित्रपटाने गोवा येथील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकाविला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, नेहूल पर्झ बिस्कार्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या रंगारंग सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. या समारंभानंतर इफ्फीचा गेले आठ दिवस सुरु असलेल्या चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. या सोहळ्यात टेक आॅफ या चित्रपटासाठी स्पेशल ज्युरी पुरस्कार देण्यात आले. तर डार्क स्खूल या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. मनोज कदाम्ह यांना क्षितिज या मराठी चित्रपटासाठी जेएसएफटी युनेस्को गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय इफ्फी २0१७ च्या जीवनगौरव पुरस्काराने कॅनडाच्या अटोम इग्वोयन यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुवर्णमयूर पुरस्काराची रोख ४0 लाख रुपयांची रक्कम निर्माता आणि दिग्दर्शक यांना विभागून देण्यात आली. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये रोख देण्यात आले. उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रीसाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि रोख १0 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. स्पेशल ज्युरी अॅवार्डसाठी १५ लाख रुपये रोख आणि चंदेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर उत्कृष्ट चित्रपटांचा चंदेरीमयूर पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी १0 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे स्वरुप आहे.