सुशांत कुंकळयेकर
मडगाव : कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगात गुंड अन्वर याचा ' तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तुरुंगातील तकलादू सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून हा व्हिडीओ आताचा नसून दोन महिन्यांपूर्वी तो शूट केल्याची माहिती हाती लागली आहे. या व्हिडीओत अन्वर यांच्याबरोबर जब्बार नावाचा आणखी एक त्याचा साथीदार दिसत असून तो दीड महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्त झाल्याची माहिती या तुरुंगातील सुत्रांकडून मिळाली आहे.
तुरुंग महानिरीक्षक आशुतोष आपटे याना याबाबत विचारले असता, हा व्हिडीओ नक्की केव्हा शूट केला गेला याची चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आम्ही काही जणांच्या जबान्या घेतल्या आहेत, त्यातून खरी माहिती पुढे येईल. त्यानंतर कैद्यांना मोबाईल वापरण्यास कुणी दिला हे बाहेर येऊ शकते असे ते म्हणाले. या तुरुंगातील काही कर्मचाऱ्यांशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता कित्येक सुरस कथा हाती लागल्या. त्यातून या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थाच कशी रामभरोसे चालू असल्याचे स्पष्ट होत आहे.
वास्तविक तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे हे जेलरचे काम असते. या तुरुंगात कैद्यांना ठेवण्यासाठी 6 सेल्स असून येथील सुरक्षेसाठी एकावेळी तुरुंगात किमान 4 सहाय्यक जेलर ड्युटीवर असणे आवश्यक असते पण कोविडचे निमित्त पुढे करून या जेलरनी स्वतःला रोटेशन पद्धतीने ड्युटी लावून घेतल्याने प्रत्येक अधिकारी 4 दिवसातून एकदा ड्युटीवर एकदा येत असून त्यामुळे काही जेल गार्डानाच जेलरची भूमिका करावी लागते. त्यामुळे जेलच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचाच बट्ट्याबोळ झाला आहे.
या जेलमध्ये सुमारे 70 गार्ड असून जेलर कामावर नसल्याने सुमारे 15 गार्डना कार्यालयात ड्युटी दिली असून कैद्यांची ने आण, त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी हे काम जे खरे जेलरांनी करायचे असते ते काम आता हे गार्ड करू लागले आहेत. हे हलके काम काही मर्जीतल्या गार्डनाच दिले जात असून त्यामुळेच सुरक्षा व्यवस्थेत गलथानपणा राहू लागला असल्याची माहिती मिळाली आहे. हे कार्यालयीन काम करणारे गार्डही दोन दिवसात एकदा या रोटेशन तत्वावर काम करत असल्याने इतर राक्षकावर कामाचा ताण वाढू लागला आहे. काही गार्डना तर वाहनचालकाचे काम देण्यात आले आहे.
या जेलमध्ये मुबलक प्रमाणात जेलर व सहाय्यक जेलर असताना कार्यालयीन कामे करण्यासाठी गार्डचा वापर करण्यामागचे कारण काय असा सवाल त्यामुळे निर्माण झाला आहे. हे ड्युटी लावण्याचे काम हल्लीच जेलरपदी बढती मिळालेले विलास परब हे करत आहेत.
कोलवाळचा तुरुंग हा मध्यवर्ती तुरुंग असल्याने या तुरुंगातील टेहेळणी व्यवस्था कडेकोट असण्याची गरज असताना या जेलमधील बंद पडलेले केमॅरे अजून दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. कैद्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी जॅमर व्यवस्था आहे ती कधीचीच बंद पडलेली असून ती कार्यान्वित करण्याच्या नावाखाली आतापर्यंत केवळ पहाणीच झाली आहे. वायरलेस यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली असून मेटल डिटेक्टरही चालत नाहीत अशी एकंदर रामभरोसे अवस्था आहे