पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने व त्या आजारपणामुळे प्रशासन ठप्प झाल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा तूर्त आणखी कुणाकडे द्यावा अशी मागणी घेऊन आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे उपोषणाला बसले आहेत. घाटे यांच्या आंदोलनाला आता हळूहळू राजकीय नेत्यांचा व अन्य घटकांचा पाठींबा मिळू लागला आहे.
घाटे यांनी आझाद मैदानावर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. घाटे हे जास्त प्रसिद्ध किंवा प्रभावी नसले तरी, त्यांना सामाजिक चळवळींचा अनुभव आहे. गोव्यात विदेशी व्यक्तींनी शेत जमिनी खरेदी करू नयेत म्हणून जी मोठी चळवळ झाली, त्याची सुरुवात घाटे यांनी काही वर्षापूर्वी शेतात नांगर घालून व प्रतिकात्मक निषेध कार्यक्रमाद्वारे केली होती. आपण पर्रीकर यांच्या विरोधात नाही किंवा अन्य कोणत्याच नेत्यांच्याही विरोधात नाही पण सध्या गोव्याच्या प्रशासनाची प्रचंड होरपळ सुरू आहे. कारण पर्रीकर आजारी आहेत. अशावेळी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अन्य कोणत्याही नेत्याकडे सोपविला जावा अशी माझी मागणी आहे असे घाटे म्हणाले. लोकशाही वाचविण्यासाठी व घटनात्मक तरतुदींचीही गोव्यात पायमल्ली होऊ नये म्हणून मी उपोषण करत आहे. ज्यांना माझी बाजू पटतेय, ते मला पाठींबा देतील, असे घाटे म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी पूर्ण रात्र घाटे हे आझाद मैदानावरच उपोषणस्थळी झोपले. समाजाच्या विविध स्तरांवरील व्यक्तींनी घाटे यांना भेटून पाठींबा देणो सुरू केले आहे. माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनीही घाटे यांची भेट घेतली. घाटे यांना माझी सहानुभूती व पाठींबा आहे, कारण ते निरपेक्षपणे काम करतात पण त्यांनी स्वत:चे आरोग्य धोक्यात घालू नये. त्यांनी प्रतिकात्मक व लाक्षणिक उपोषण केले हे चांगले झाले पण आमरण उपोषण करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये अशी विनंती मी घाटे यांना केली आहे व त्यावर ते विचार करतील असे मला वाटते, असे नार्वेकर म्हणाले. घाटे हे काँग्रेसचेही सदस्य आहेत. अखिल भारतीय काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख रणदीप सिंग सुरजेवाला हे गोव्यात आलेले आहेत. सुरजेवाला हेही शनिवारी घाटे यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले.