मडगाव: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसह सर्वसामान्यांना आता वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. राज्यातील आरटीओ निरीक्षकांना दर महिन्याला आता प्रत्येकी 100 जणांना दंड ठोठावण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गोव्यातील आरटीओ अधिकारी वाहन चालकांकडून किरकोळ चूक झाली, तरी दंड ठोठावू शकतात. गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना आता पोलिसांप्रमाणो आरटीओ निरीक्षकांनाही दंड आकारण्याचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे निरीक्षकांना महिन्याकाठी किमान शंभर वाहन चालकांकडून दंड वसूल करणं आवश्यक आहे. या कामात कुचराई झाल्यास पुढील महिन्यात हे प्रमाण दुप्पट होणार आहे.गोव्यातील आरटीओ निरीक्षकांची एकूण संख्या पाहता दरमहा दंड आकारण्याचे हे टार्गेट 9 हजारच्यावर जाणार आहे. यात हेल्मेटविना दुचाकी चालवणं, मद्यान करुन वाहन चालवणं, परवान्याशिवाय वाहन चालविणं तसेच खासगी वाहनांचा वापर पर्यटकांसाठी करणं या गुन्ह्यांचा समावेश आहे. सर्वात अधिक टार्गेट मडगावच्या एन्फॉर्समेंट विभागाला देण्यात आलेलं असून या विभागाला दरमहा 2000 वाहनांना दंड ठोठावण्याची सक्ती केली आहे. त्या पाठोपाठ पणजीच्या एन्फॉर्समेंट विभागाला 1400 चं टार्गेट ठेवलं आहे. विमानतळ असलेल्या वास्को आरटीओ कार्यालयाला आणि व्यापारी केंद्र असलेल्या मडगाव कार्यालयाला प्रत्येकी 700, डिचोली कार्यालयाला 600, पणजी, म्हापसा व केपे या कार्यालयांना प्रत्येकी 500, फोंडा कार्यालयाला 300 तर पेडणो, काणकोण व धारबांदोडा कार्यालयांना प्रत्येकी 200 चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. याशिवाय धारगळ, मोले व पोळे या तीन चेक नाक्यावर प्रत्येकी 300 चे तर दोडामार्ग व केरी या चेक नाक्यावर प्रत्येकी 100 चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.आरटीओ निरीक्षकांनी आपले टार्गेट पूर्ण न केल्यास दुसऱ्या महिन्यात त्यांना दुप्पट टार्गेट दिलं जात असल्यानं सध्या गोव्यातील आरटीओ अधिकारीही हवालदिल झाले आहेत. टार्गेट पूर्ण न झाल्यास शनिवारी-रविवारी कामावर येऊन टार्गेट पूर्ण करावे असं त्यांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता रात्रीच्यावेळीही आरटीओ अधिकारी पोलिसांप्रमाणे घोळक्याने गोव्यातील रस्त्यावर दिसण्याची शक्यता असून त्यांचे पहिले टार्गेट परराज्यातून येणारी वाहनं आणि पर्यटक हेच असण्याची शक्यता आहे.
पर्यटनासाठी गोव्यात जाताय? आरटीओपासून जरा सांभाळून राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 5:52 PM