मडगाव - कारवार-गोवा महामार्गावरील पोळे-काणकोण येथे सीमेवर असलेल्या आरटीओ चेकनाक्यावर बुधवारी पहाटे भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलिसांनी छापा टाकून आरटीओ निरीक्षक वामन परब आणि अन्य दोन एजंटांना अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून दीड लाख रुपयांची रक्कमही जप्त केली.
आरटीओच्या पोळेच्या चेकनाक्यावर राज्याबाहेरुन येणाऱ्या वाहनांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या रक्कम उकळली जाते अशी तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या दरम्यान भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी ही कारवाई केली. या कारवाईत मुळ माजाळी-कारवार येथील बसवराज उर्फ शोटू व जितेंद्र वेळीप या दोन एजंटांवरही कारवाई करण्यात आली. सदर एजंट पैसे घेत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे 50 हजाराची रक्कम सापडली.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चेक नाक्यावरुन जमा केलेले पैसे छोटू हा प्रत्येक दोन तासानंतर आपल्या माजाळी येथील घरात नेऊन ठेवतो अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याच्या घरावर छापा टाकला असता तिथे पोलिसांना एक लाख रुपयाची रक्कम सापडली. पोलिसांनी ती रक्कम जप्त केली. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन पणजीत नेण्यात आले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलिसांना या चेकनाक्यावरील बेकायदेशीर व्यवहाराची तक्रार आल्यानंतर सोमवारी त्यांनी चेक नाक्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.