- सचिन कोरडे पणजी : देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजन समितीने वेग धरला असून त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे बोधचिन्ह आणि स्पर्धा गीत याची निवडही करण्यात आली आहे. राज्य पक्षी असलेल्या बुलबुल (रुबीगुला) याची बोधचिन्ह म्हणून निवड करण्यात आली. २० डिसेंबर रोजी एका पंचतारांकित हॉटेलात हा अनावरण सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोजकांकडून मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.गोव्यात होणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेची अधिक चर्चा रंगत आहे. शिवाय स्पर्धेसाठी सुरू असलेल्या तयारीचा संथ वेग पाहता अजूनही संशयास्पद वातावरण आहे. परंतु, स्पर्धेच्या आयोजन समितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विडा उचलला असून त्या दृष्टीने तयारीचा वेग वाढवला आहे. गोव्यात ही स्पर्धा ३० मार्च ते ४ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. नुकतीच स्पर्धेची तांत्रिक समिती पाहणी करून गेली. त्यांनी तयारीचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे आटोपून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. अशा स्थितीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह व स्पर्धा गीताचे होणारे अनावरण कुठेतरी दिलासा देणारे ठरेल. मात्र, याबाबत स्पर्धेच्या आयोजन समितीला, अधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.यासंदर्भात, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे संयुक्त सीईओ व्ही. एम. प्रभुदेसाई म्हणाले, ‘आम्ही २० डिसेंबरला बोधचिन्हाचे अनावरण करीत आहोत. हा कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा याबाबत आम्ही शासनदरबारी चर्चा करीत असून याविषयी अधिकृतरीत्या कळविले जाईल.’
गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:27 AM