लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धारगळ येथे सनबर्नविरोधकांच्या आंदोलनातील हवा काढण्यात सरकार यशस्वी झाले आहे. विरोध करणारे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांचे कार्यकर्तेच फोडत अखेर गुरुवारी पर्यटन खात्याने स्पेस बाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. कंपनीला येत्या २८ ते ३० डिसेंबर या काळात धारगळ येथेच सनबर्न (ईडीएम) महोत्सव आयोजित करण्यास तत्त्वतः मान्यता दिली.
स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी धारगळमध्ये सनबर्न आयोजित करण्यास कडाडून विरोध केला होता. स्थानिक रहिवाशांचा एक गट या ईडीएमच्या विरोधात होता तर दुसरा गट समर्थन करीत होता. स्थानिक ग्रामपंचायतीनेही या ईडीएमला परवानगी दिली होती. आर्लेकर व सनबर्नविरोधकांनी हा ईडीएम धारगळला झाल्यास उधळून लावण्याचा इशारा दिला होता.
विशेष म्हणजे विरोध चालू असतानाही धारगळमध्ये बडे उद्योजक जयदेव मोदी यांच्या जागेत ईडीएमसाठी स्टेज उभारणी तसेच अन्य कामे नेटाने चालू होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो धारगळलाच होणार, असे सांगितले जात होते. धारगळच्या पंचायत मंडळाने ५ विरुद्ध ४ मतांनी सनबर्नला परवानगी देण्याचा ठराव संमत केला होता. त्यानंतर सत्ताधारी गटाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेटही घेतली.
ग्रामसभेच्या ठरावाला स्थगिती
२४ नोव्हेंबर रोजी धारगळच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत सनबर्नला विरोध करणारा जो ठराव घेतला होता, त्या ठरावाला अतिरिक्त पंचायत संचालकांनी येत्या १८ तारीखपर्यंत स्थगिती दिली आहे. कंपनीने पंचायत राज कायद्याच्या पोटकलम ६ (५) अन्वये हे अपील दाखल केले आहे. पंचायतीच्या सूचना फलकावर अपिलाची जाहीर सूचना प्रदर्शित करण्यात आली आहे. कायद्याच्या पोटकलम ६ (५) नुसार, 'ग्रामसभेच्या निर्णयामुळे अन्याय झालेली कोणतीही व्यक्ती अशा निर्णयाच्या किंवा ठरावाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पंचायत संचालकाकडे अपील करू शकते. सनबर्नचे आयोजन करणाऱ्या स्पेस बाउंड वेब लॅब्स प्रा. लि, कंपनीने ग्रामसभेच्या ठरावाला अतिरिक्त पंचायत संचालकांकडे आव्हान दिले होते.
आर्लेकर म्हणतात...
सरकारने सनबर्नला विरोध करणारे आर्लेकर यांना एकाकी पाडले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत मन वळवले आणि विरोधाची धार बोथट केली. त्यांची पूर्वीची आक्रमकताही आता कमी झालेली आहे. 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमचा विरोध कायम आहे. हा ईडीएम आम्ही होऊ देणार नाही, असे पूर्वी म्हटले होते. परंतु आता प्रकरण हायकोर्टात आहे. त्यामुळे कोर्टाचा काय निवाडा येतो ते पाहू. सनबर्नला विरोध करणाऱ्या आमच्या लोकांचा छळ सुरू आहे. काहीजणांना नोटिसा पाठवल्या. मात्र आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. सनबर्नला विरोध कायम राहील. उद्या कोर्टाने या ईडीएमसाठी परवानगी दिली तरी मी मात्र उद्घाटनाला वगैरे जाणार नाही. सनबर्नपासून मी दूरच राहीन.
काहींना नोटिसा
ईडीएमला विरोध करणाऱ्या काहीजणांना सूड भावनेने नोटिसा पाठवून त्यांचा छळ सुरू केल्याचे तसेच सरकारी सेवेत असलेल्या काहीजणांच्या बदल्या केल्याच्याही तक्रारी होत्या. धारगळमधील रहिवाशी सनबर्नविरोधात कोर्टातही गेले आहेत.