मडगाव: कुंकळी औद्योगिक वसाहत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्याने हे क्षेत्र कंटेनमेन्ट विभाग म्हणून जाहीर करावा अशी मागणी घेऊन कुंकळीचे नगरसेवक शशांक देसाई यांनी मुबंई उच्च न्यायालयात धाव घेतली असून मंगळवारी ही याचिका दाखल करून घेताना कुंकळी पालिकेलाही या याचिकेत प्रतिवादी करून घेण्यात यावे असा आदेश न्या. महेश सोनक व न्या. एम. एस. जवळकर यांनी दिला. ही सुनावणी आता 11 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
कुंकळी औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत 30 कोरोना रुग्ण आढळून आले असून जवळच्या सिम्पलेर या गावातही आणखी 15 रुग्ण आढळून आल्याने ही वसाहत सील न केल्यास ही साथ कुंकळीत इतर ठिकाणी पसरण्याची भीती असल्याचा देसाई यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे.
देसाई यांच्यावतीने युक्तिवाद करताना ऍड. जतीन रामय्या यांनी अशाच प्रकारची मागणी कुंकळी पालिकेनेही सरकारकडे केल्याचे न्यायालयाचा लक्षात आणून दिल्यावर पालिकेलाही प्रतिवादी बनवून घेण्याचा आदेश देत पालिकेने आपली बाजू 11 ऑगस्ट पर्यंत मांडावी असे सूचित करण्यात आले आहे. या याचिकेत राज्य सरकार बरोबर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याला प्रतिवादी करण्यात आले आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत इतर ठिकाणी कमी रुग्ण आढळूनही त्या जागा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेन्ट विभाग घोषित केल्या पण औद्योगिक वसाहत अद्याप घोषित केलेली नाही. या वसाहतीत अजून कोविड निगा केंद्र स्थापन केलेले नाही. या वसाहतीतून कोविडचा प्रसार होण्याची शक्यता असतानाही या वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांवर हवी तशी देखरेख ठेवण्यात आलेली नाही याकडे या याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.