पणजी : देश-विदेशातून गोव्यात येणार्या पर्यटकांच्या मनात गोवा म्हणजे दारू असे समीकरण झालेले असते पण वस्तूस्थिती थोडी वेगळी आहे. मद्य व्यवसाय हा गोव्यात महत्त्वाचा आहेच, पण गोव्याच्या ग्रामीण भागातील महिला त्यांच्या नवर्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळल्या असून दारूबंदीची मागणी करत त्या रस्त्यावर उतरल्या आहेत.
राजधानी पणजीपासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या केपे तालुक्यातील बार्शे पंचायत क्षेत्रातील गोकुल्डे, किस्कोण, खेडे व पाडी या वाड्यांवरील महिलांनी आपल्या परिसरातील मद्यविक्री बंद करण्याची मागणी केली आहे. या विषयावरून बैठक बोलविण्यासही महिलांनी पाडी--बार्शे ग्रामपंचायतीला भाग पाडले.
अनेक महिलांनी हातात दारूबंदीचे फलक घेत मद्यविक्री विरूद्ध मोर्चा तथा जागृती फेरी काढली. आपल्या परिसरात बेकायदा पद्धतीने दारू विक्रीचे गुत्ते चालतात. घरातील पुरुष रोज दारू पिऊन बायकांना मारहाण करतात, अशा तक्रारी महिलांनी पंचायतीकडे केल्या आहेत.
अनुसूचित जमातीतील अनेक लोक या पंचायत क्षेत्रात राहतात. दारुच्या व्यसनाला लागलेले पुरूष अकाली मरण पावतात असाही अनुभव काही महिलांनी सांगितला. सर्व बेकायदा दारू विक्री बंद झाली नाही तर आम्ही पुढील पाऊले उचलू, असा इशारा महिलांनी दिला आहे. उपसरपंच श्रद्धा वेळीप, माजी उपसरपंच सविता गावकर, माजी सरपंच सीमा वेळीप अशा काही महिला लोकप्रतिनिधींचाही दारुबंदीला पाठिंबा आहे. जर लोकांना दारू विक्री नको असेल तर माझाही लोकांच्या मागणीला पाठिंबा असेल असे सरपंच अर्जुन वेळीप यांनी सांगितले. पंचायतीच्या बैठकीत महिलांच्या मागणीबाबत चर्चा झाली. 'लोकमत'चे खोतीगावचे वार्ताहर देवीदास गावकर यांनीही मोर्चातील काही महिलांशी बोलून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.