पणजी : या आठवड्यात शैक्षणिक निकाल जाहीर झाले आणि मुलांच्या पुढच्या वर्गाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा पालकांची धावपळ सुरू झाली. राज्यात इयत्ता अकरावीचा निकाल आठ दिवसांपूर्वीच जाहीर झाला आणि बारावीसाठी नव्याने अॅडमिशन घेण्यासाठी विविध उच्च माध्यमिक विद्यालयांत पालक आणि मुलांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत म्हणजे २९ आणि ३0 एप्रिल रोजी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे मुलांची शाळा बदलणे, दुसऱ्या शहरात, राज्यांत जाण्यासाठी मुलांची नावे काढणे, दुसऱ्या शाळेत नोंदणी करणे या कामात पालक व्यस्त दिसत आहेत. पणजी येथील मुष्टिफंड हायस्कूलमध्येही शनिवारी सकाळीच १२ वीसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांची गर्दी दिसत होती. विविध शाळांमध्ये नावनोंदणी झालेल्या मुलांचे पालक गणवेश पद्धती, अर्जाचे सोपस्कार, नावनोंदणीची प्रक्रिया करण्यात व्यस्त दिसत आहेत. राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला वेळ असला तरी नावनोंदणीची प्रक्रिया, गणवेश इत्यादीचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर नावनोंदणीला अधिक गती येईल. ६ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रवेशासाठी विद्यालयांत गर्दी
By admin | Published: May 01, 2016 2:26 AM