पणजी : रशिया- युक्रेन युद्धाचा गोव्याच्या पर्यटन व्यवसायावरच नव्हे तर अर्थकारणावरही परिणाम होणार असल्याचा दावा पर्यटन खात्याचे संचालक मिनिन डिसौजा यांनी केला.
ते म्हणाले की, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये रशियन नागरीकांचा पहिला क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटकांचा क्रमांक लागतो. युद्धापूर्वीही वरील दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते तेव्हा अनेक चार्टर विमाने रद्द झाली. आता युद्ध सुरू झाल्याने चार्टर विमाने रद्द झाल्यास त्याचा मोठा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होईल.
दरम्यान, गोव्यात उद्या शनिवारपासून कार्निव्हलची धूमधाम सुरू होणार असल्याने राज्यातील हॉटेल्स फुल्ल आहेत. देशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. कार्निव्हलचा आनंद लुटण्यासाठी शेजारी महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली तसेच इतर भागातून देशी पर्यटक दाखल झाले आहेत.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांना क्षमतेच्या ५० टक्के ऑक्कुपन्सीने हॉटेले चालवावीत, अशी जी अट घातली आहे ती अट काढून टाकावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे. गोव्यात दरवर्षी साधारणपणे १० लाख विदेशी तर ९० लाख देशी पर्यटक भेट देत असतात. विदेशी पाहुण्यांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्यांमध्ये रशियन नागरिकांची संख्या जास्त असते.