सुशांत कुंकळयेकर
मडगाव - राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन उत्तर गोव्यात पुन्हा एकदा अंमली पदार्थाचे व्यवहार सुरू झाले आहेत. सध्या या व्यवसायात रशियन्स नागरीक अधिक सक्रीय झाले असून मागच्या दोन दिवसांत उत्तर गोव्यातील शिवोली या भागात अशाप्रकारची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यात रशियन्स नागरिकांचा हात असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी अंजुणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मार्ना-शिवोली येथील बाजारात ड्रग्स विकण्यासाठी आलेल्या सेर्जीओ वांन्स्तेसोव या 36 वर्षीय रशियन नागरिकाला अटक केली आहे.
वास्तविक सध्या गोव्यात पर्यटनाच्या दृष्टीने ऑफ सिझन चालू असून खरे तर आता ड्रग्स व्यवसाय मंदावण्याची गरज होती. असे असतानाही उत्तर गोवा किनारपट्टीत अजुनही हे प्रकार चालू असून या महिन्याच्या पहिल्या 13 दिवसांतच 11 प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यातील पाच प्रकरणात विदेशी नागरिकांचा समावेश असून यातील तीन प्रकरणे रशियन नागरिकांशीच संबंधीत आहेत.
शुक्रवारी (12 एप्रिल) अंजुणा पोलिसांनी अशाचप्रकारे छापा टाकून एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. अंजुणाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिवोली बाजारात हा रशियन नागरीक ड्रग्स विकायला आला होता. त्याला पकडण्यात आले त्यावेळी त्याच्याकडे कोकेन, चरस आणि मेटारफीन असे एकूण 6.70 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले आहेत. गुरुवारी गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अशाचप्रकारे शिवोली येथे धाड घालून ग्रिगोनी फोमेन्को (32) व त्याची पत्नी व्हिक्टोरिया (29) या दोन रशियन नागरीकांना अटक केली होती. हे संशयित शिवोलीत रहात असलेल्या घरात गांजाचे पीक घेत होते असे उघडकीस आले असून पोलिसांनी घातलेल्या धाडीत गांजाची रोपेही सापडली होती.
गोव्यात पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट आणि आश्र्वे-पेडणो या भागातही ड्रग्स प्रकरणात विदेशी आरोपींचा समावेश असल्याचे उघड झाले होते. 1 एप्रिल रोजी कळंगूट पोलिसांनी चिनेडू नावाफोर (32) या नायजेरियन नागरिकाला अटक करुन त्याच्याकडून 30 हजाराचा चरस जप्त केला होता. त्याच्या दुस:याच दिवशी आश्र्वे-पेडणो येथे घातलेल्या धाडीत माक्सीम खुशानी (31) या रशियनाकडे 2.40 लाखांचा चरस सापडला होता. याशिवाय कोलवाळे तुरुंगात स्थानबद्ध असलेल्या जेम्स संडे या नायजेरियाच्या एका तरूणाकडे 10 हजाराचा गांजा सापडला होता.आतापर्यंत मागील 13 दिवसात ड्रग्स संदर्भातील जी 10 प्रकरणे उघडकीस आली आहेत त्यातील पाच प्रकरणात विदेशी नागरिकांचा हात आहे. दोन प्रकरणात भारतीयांचा समावेश असून अन्य तीन प्रकरणात स्थानिक युवक सामील असल्याचे दिसून आले आहे.