लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यात पहिल्यांदाच जीएचबी (डेट रेप ड्रग्ज) हा अमलीपदार्थ केरी-पेडणे येथून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचा पार्टीमध्ये वापर होत असून या प्रकरणी एका रशियन महिला डीजेला अटक करण्यात आल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी दिली.
ही रशियन महिला मागील १० वर्षांपासून गोव्यात येत असून ती छोट्या डीजे पार्त्या आयोजित करते. तिच्या घरातून ३०० ग्रॅम जीएचबी व ३० ग्रॅम गांजा असा १६.८८ लाखांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर महिला ही केरी पेडणे येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होती. गोव्यात अशा प्रकारे जीएचबी अर्थात डेट रेप ड्रग्ज हे पहिल्यांदाच आढळून आले आहे. साध्या भाषेत त्याला लिक्विड एक्सटसी, असेही म्हटले जाते. याचा वापर हा पार्थ्यांमध्ये जास्त केला होता. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई अमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक सज्जिद पिल्लई यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक सुनील फालकर, हेड कॉन्स्टेबल युस्टाकियो फर्नाडिस, कॉन्स्टेबल सचिन आटोस्कर, विशाल शितोळे, महिला कॉन्स्टेबल दीपा बांदेकर, ज्योती नाईक व चालक कॉन्स्टेबल कुंदन पाटेकर यांच्या पथकाने केली.