पणजी : बहुचर्चित एस. दुर्गा हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यास स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नकार दिला तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अजून नमलेले दिसत नाही. इफ्फी संचालनालयानेही अजून ताठर भूमिका घेतलेली आहे. यामुळे एस. दुर्गा सिनेमा गोव्यात सध्या सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) प्रदर्शित होण्याची शक्यता अंधुक दिसत आहे.
एस. दुर्गा सिनेमाची निवड भारतीय पॅनोरमा विभागासाठी ज्युरी मंडळाने प्रारंभी केली होती. तथापि, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने ज्युरींना अंधारात ठेवून हा सिनेमा वगळता व तो प्रदर्शित होण्यापासून रोखण्याचे सर्व ते प्रयत्न आतापर्यंत मंत्रालयाने केले आहेत. केरळसह गोव्यातीलही सिनेनिर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेरसिकांमध्ये याविषयी नाराजीची भावना आहे. इफ्फीस्थळी ही नाराजी व्यक्त होत आहे. बॉलिवूडच्या काही कलाकारांनी इफ्फीवर बहिष्कारही टाकला आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने दिलेला आदेश रद्द करावा व एस. दुर्गा चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती द्यावी म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने केंद्राची याचिका ऐकून घेतली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली पण खंडपीठाने स्थगिती दिली नाही. ज्युरींना एस. दुर्गा सिनेमा दाखविला जावा व त्यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश केरळच्या उच्च न्यायालयाने दिला. मात्र हा सिनेमा ज्युरी मंडळींना दाखविण्याबाबत तसेच तो इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलय आणि इफ्फी संचालनालय अजून आढेवेढे घेत आहे. याविरुद्ध एस. दुर्गा सिनेमाचे निर्माते केरळच्या न्यायालयात अवमान याचिका सादर करण्याची शक्यता आहे.
एस. दुर्गा सिनेमाची सेन्सर प्रिंट आणि सेन्सर बोर्डाचे प्रमाणपत्र आणण्यास इफ्फी संचालनालयाने संबंधितांना सांगितले असल्याची माहिती मिळाली. मुळात गोव्यात गेल्या 20 नोव्हेंबरला सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या मंगळवारी (28 नोव्हेंबर) रोजी इफ्फीचा समारोप होणार आहे. केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एकूण तेरा ज्युरींपैकी फक्त तीन ज्युरी सध्या गोव्यात आहेत. तीन ज्युरींनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. ज्युरींना एस. दुर्गा कधी दाखविला जाईल ते अजून स्पष्ट झालेले नाही.