संदीप आडनाईकपणजी : गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस. दुर्गा हा तमिळ चित्रपट दाखविण्याच्या हालचाली इफ्फी प्रशासनाकडून सुरु केल्यामुळे हा चित्रपट महोत्सवात दाखविल्यास याद राखा, असा सज्जड दम गोव्यातील स्वयंसेवी संघटनेने दिला आहे. त्यामुळे या महोत्सवामागे लागलेले शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. दरम्यान, हा चित्रपट मंगळवारी इफ्फीत दाखविण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून दिग्दर्शक सनल शशिधरन गोव्यात आले आहेत. इफ्फी संचालकांकडे या चित्रपटाचे सेन्सार प्रमाणपत्रही सादर करण्यात आले आहे.सध्या पद्मावती, एस. दुर्गा, न्यूड आणि दशक्रिया या चित्रपटावरुन देशभर वादविवाद सुरु आहेत. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून एस. दुर्गा आणि न्यूड हे दोन चित्रपट वगळल्यानंतर या वादात आणखी भर पडली आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने हा चित्रपट दाखविण्यास हरकत नाही, असे इफ्फी प्रशासनाला सुनावल्यानंतर सेक्सी दुर्गाऐवजी एस. दुर्गा असे नामकरण नव्याने करुन हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी इफ्फीने सुरु केली आहे.दरम्यान, हिंदूच्या भावना दुखावतील असा कोणताही चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही, हा चित्रपट इफ्फीत दाखविल्यास याद राखा, असा सज्जड दम गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक या संघटनेने दिला आहे. या संघटनेच्या पदाधिका-यांनी इफ्फीचे संचालक सुनीत टंडन यांना पाठविलेल्या पत्रात हा चित्रपट महोत्सवात न दाखविण्याचा इशारा दिला आहे. भावना दुखावणारे शीर्षक जरी बदलले असले तरीही चित्रपटात हिंदूंना वंदनीय असलेल्या दुर्गादेवीला जळत्या निखाºयावरुन चालताना दाखविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास इफ्फीला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही संघटनेने दिला आहे.येत्या मंगळवारी इफ्फीचा समारोप होणार आहे. त्या दिवशीच हा चित्रपट दाखविण्यात येईल, अशी अटकळ आहे. इफ्फीचे संचालक सुनीत टंडन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशिधरन यांना या चित्रपटाचे सेन्सार प्रमाणपत्र, दोन डीव्हीडी आणि केरळ उच्च न्यायालयाचे निकालपत्र सादर करण्यास सांगितल्यानंतर इफ्फीच्या संचालकांकडे शनिवारी सायंकाळीच ही पूर्तता करण्यात आली आहे.हा चित्रपट इफ्फीत न दाखविण्याच्या निर्णयावरुन १३ ज्युरींपैकी ३ ज्युरींनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. सध्या गोव्यात केवळ ३ ज्युरीच उपलब्ध असल्यामुळे आज ते चित्रपट पाहून निर्णय देणार असल्याचे समजते. ज्युरींनी यापूर्वीच हा चित्रपट दाखविण्याची शिफारस इफ्फी निवड समितीकडे केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशिधरन, अभिनेता कन्नन नायर आणि राजश्री देशपांडे हे सध्या गोव्यात उपस्थित आहेत. शशिधरन शनिवारी रात्रीच गोव्यात आले असून त्यांनी हा चित्रपट येथे दाखविला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.चित्रपट दाखविणे ही आता इफ्फीची जबाबदारी आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांना हा चित्रपट दाखविणे बंधनकारक केले आहे. या महोत्सवात हा चित्रपट दाखविला जाईल, अशी मला खात्री वाटते.सनल शशिधरन, दिग्दर्शक, एस. दुर्गाहा चित्रपट इफ्फीने दाखवावा. कोणत्याही भुरट्या संघटनेच्या दबावाला बळी पडून चांगला चित्रपट न दाखविणे, हे करंटेपणाचे लक्षण आहे. कोणाच्याही भावना या चित्रपटामुळे दुखावल्या गेलेल्या नाहीत.दिलिप बोरकर,चित्रपटप्रेमी व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते.